
सामना ऑनलाईन, मुंबई
दुष्काळपीडित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना सरसावली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 9 जून रोजी (रविवार) दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात जालना, धाराशीव, संभाजीनगर, बीड, सोलापूर, नगर, सांगली, सातारा आणि नाशिक या दुष्काळी भागातील चारा छावण्यांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे या शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10 वाजता अन्नधान्य वितरणाला सुरुवात
जालना जिह्यातील साळेगाव येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अन्नधान्य वितरणाची सुरुवात करण्यात येणार आहे.शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोलापूर जिह्यातील अन्नधान्य वितरणाची सुरुवात करण्यात येणार आहे. या जिह्यातील मोहोळ, सोलापूर दक्षिण आणि उत्तर, अक्कलकोट तसेच बार्शी तालुक्यातील दुष्काळपीडित शेतकऱ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येणार आहे.
येथील चारा छावण्यांचीही पाहणी करणार
धाराशीव जिह्यातील भूम तालुक्यातील हंडुग्री, वालवड आणि चिंचपूरढगे तसेच सोलापूर जिह्यातील सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, माढा, पंढरपूर या तालुक्यांतील चारा छावण्यांना भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे. सोलापूर जिह्यात 215 आणि धाराशीव जिह्यात 95 चारा छावण्यांमध्ये हजारो शेतकरी वास्तव्य करत आहेत.
अन्नधान्य वितरणाचे नियोजन आणि व्यवस्था
शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, शिवेसना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विधिमंडळातील शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू हे वितरणाचे नियोजन करत आहेत. तर शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते हे नगर जिह्यात उपस्थित राहून वितरणाची व्यवस्था पाहणार आहेत. जालना आणि संभाजीनगर जिह्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सांगली आणि सातारा जिह्यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे, नाशिक जिह्यासाठी राज्यमंत्री दादा भुसे, सोलापूर आणि धाराशीव जिह्यासाठी शिवेसना उपनेते आणि आमदार तानाजी सावंत, बीड जिह्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर वितरणाची व्यवस्था पाहणार आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे संभाजीनगर आणि जालना जिह्यात उपस्थित राहणार असून वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्हानियाय शिवसेना खासदार, आमदार, संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.































































