
दक्षिण अफ्रिकेतील युगांडा येथून फलटणमध्ये आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगसाठी मुंबई आणि पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
9 डिसेंबर रोजी आफ्रिकेतील युगांडावरून हे चौघेजण मुंबईला आले होते. त्यावेळी विमानतळावर उतरल्यावर त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तरीसुद्धा त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला होता. यानंतर काल ते फलटणला येऊन होम आयसोलेट झाले होते. प्रशासनाने काल त्यांचे स्वॅब घेतले होते.
आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी तातडीने बैठक बोलावून कडक उपायोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली की नाही याची शक्यता प्रशासन पडताळून पाहत आहे. त्यांचे स्वॅब मुंबई, पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

























































