युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांचे हाल आणि हिंदुस्थानी दूतावासाची फायनल वार्निंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेनची राजधानी क्यीव आणि खारकीव्ह येथे रशियन फौजांकडून प्रचंड हल्ले सुरू असून, अक्षरशः विध्वंस होत आहे. या भयंकर परिस्थितीत हजारो हिंदुस्थानी विद्यार्थी येथे अडकल्याचे वृत्त आहे. तत्काळ खारकीव्ह सोडा. वाहन मिळत नसेल तर सेफ झोनपर्यंत चालत निघा अशी फायनल वॉर्निंग हिंदुस्थानी दूतावासाने दिली आहे. कडाक्याच्या थंडीत, जीव मुठीत धरून विद्यार्थी 16 कि.मी.पर्यंतची पायपीट करीत सेफ झोनपर्यंत पोहचत आहेत.

हिंदुस्थानी दुतावासाने बुधवारी एका तासाच्या अंतरात दोनवेळा अॅडव्हायजरी जारी केल्या. दुपारी 1.40 आणि 2.40 वाजता (हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 आणि 6 वाजता) विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या. खारकीव्हमधून तत्काळ बाहेर पडा. मिळेल त्या वाहनातून सेफझोनपर्यंत जा. वाहने मिळाले नाहीतर चालत निघा असे दुतावासाने स्पष्टपणे अॅडव्हायजरीत म्हटले आहे. दुतावासाने तीन सेफ झोन जाहीर केले आहेत. खारकीव्हपासून हे तीन सेफ झोन अंतर 11 ते 16 कि.मी. वर आहेत. पिसोचिन (11 कि.मी.), बाबे (12 कि.मी.) आणि बेझलुडोव्हका (16 कि.मी.) हे सेफ झोन आहेत. कडाक्याच्या थंडीत विद्यार्थी पायपीट करीत निघाले आहेत. या तीन सेफझोनपासून विद्यार्थ्यांना युक्रेन सीमेबाहेर सुरक्षित नेण्यात येईल.

केंद्राचा घोळ; किती विद्यार्थी अडकले? यावर वेगवेगळे दावे

  • खारकीव्ह आणि सुमी शहरात 7 हजार विद्यार्थी अडकल्याचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
  • परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी मात्र आतापर्यंत 17 हजार हिंदुस्थानी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी युक्रेनची सीमा सोडल्याचा अंदाज आहे अशी माहिती दिली.

खारकीव्हमध्ये प्रचंड विध्वंस; स्थलांतर सुरूच

  • खारकीव्हमध्ये रशियन फौजांनी लष्करी, सरकारी इमारतींसह नागरीवस्त्यांवरही क्षेपणास्त्र डागले. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. हॉस्पीटलवरही बॉम्बहल्ला करण्यात आला. 21 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 336 वर जखमी आहेत. खारकीव्हमध्ये सर्वत्र विध्वंस सुरू आहे.
  • रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या नागरिकांचे स्थलांतर वाढले आहे. सुमारे 8 लाख 60 हजारांवर नागरिकांनी देश सोडला आहे. त्यातील सर्वाधिक 2 लाख 81 हजार जणांनी पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे.
  • युक्रेनच्या मिग-29 विमानाने रशियाचे दोन सुखोई फायटर पाडले. आतापर्यंत सहा हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

युक्रेनमध्ये 20 हजार हिंदुस्थानी विद्यार्थी-नागरिक होते. त्यातील 17 हजार जणांनी सीमा ओलांडली तर मग सात हजार विद्यार्थी खरंच अडकले आहेत का? राजधानी क्यीवमध्ये कोणी हिंदुस्थानी आहे का, याची चिंता देशाला लागली आहे. सर्वांना सुखरूप मायदेशी आणण्याची मागणी होतेय.