
गतविजेत्या उमर इलेव्हन एंजल स्पोर्ट्सने ‘टेनिस क्रिकेटची आयपीएल’ असलेल्या सुप्रिमो चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन्ही लढती जिंकत स्पर्धेत विजयाचा षटकार ठोकला. त्यांनी सलामीच्या लढतीत एसएससीसी डोंबिवली आणि उपांत्यपूर्व फेरीत रायगड इलेव्हन ट्रायडेंटचा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली.
सुप्रिमो चषक स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला तो गतविजेत्या उमर इलेव्हन संघाने. सुप्रिमो चषकातील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या अनिकेत सानपने 11 धावांत 3 विकेट टिपत एसएससीसी संघाच्या डावाला सुरुंग लावला. राजू मुखियानेही 2 विकेट घेत एसएससीसीला 55 धावांवर रोखले. प्रत्युत्तरादाखल मुन्ना शेखच्या 22 धावांच्या वेगवान खेळीने उमर इलेव्हनला 14 चेंडू आधीच विजय मिळवून दिला.
दुसऱया सामन्यात उरण रायगड इलेव्हनने सिपंदर भट्टी (20) आणि बंटी पटेल (22) यांच्या फटकेबाजीमुळे 6 बाद 83 अशी जबरदस्त मजल मारली. एकेएम स्पोर्ट्स गावदेवी गावठण संघाला हे आव्हान पेलवलेच नाही. इरफान मलिक आणि विश्वजीत ठाकूर यांच्या अचूक माऱयापुढे एकेएमचा संघ 59 धावाच करू शकला आणि रायगड इलेव्हनने 24 धावांनी दणदणीत विजय नोंदविला. पहिल्या दोन लढतींच्या विजेत्यांमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उमर इलेव्हनने मुन्ना शेख (21) आणि श्रेयस कदम (21) यांच्या घणाघातामुळे 6 बाद 69 अशी आव्हानात्मक मजल मारली. 70 धावांचा पाठलाग करताना सुनील चावरीने जोरदार खेळ करीत सामन्यात चुरस निर्माण केली. शेवटच्या दोन षटकांत 21 धावांची गरज होती. पण भावेश पवार आणि राजू मुखियाने अप्रतिम गोलंदाजी टाकत रायगड इलेव्हनला अक्षरशः बांधून ठेवले आणि केवळ 10 धावाच दिल्या. चावरीने 2 षटकार आणि 2 चौकार खेचत नाबाद 31 धावा केल्या. अनिकेत सानपने या सामन्यातही 2 विकेट घेत उमर इलेव्हनला उपांत्य फेरी गाठून दिली. या विजयासह उमरने सुप्रिमोमध्ये सलग सहा सामने जिंकले. सलग सहा सामने जिंकणारा उमर इलेव्हन हा पहिलाच संघ ठरला आहे.
ही गर्दी कुणाची…
विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस आणि विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब यांच्या संकल्पनेतून दिवसेंदिवस अफाट लोकप्रिय होत असलेल्या सुप्रिमो चषकाच्या दहाव्या हंगामाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 15 हजार प्रेक्षकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन आणि उभारलेल्या प्रेक्षा गॅलेरीमुळे मध्यरात्री सव्वातीनपर्यंत सुरू असलेला सुप्रिमो थरार पाहण्यासाठी क्रिकेटवेडय़ा प्रेक्षकांची गर्दी जराही कमी झाली नाही. ही गर्दी पुढील चारही दिवस वाढतच जाणार असल्यामुळे प्रेक्षकांवर नियंत्रण ठेवण्याची फार मोठी जबाबदारी सुप्रिमोच्या कार्यकर्त्यांवर असेल. आयोजकांनी गर्दी आणि वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे.
सुप्रिमो विक्रम
सुप्रिमोच्या दहा वर्षांच्या इतिहासात सलग सहा सामने जिंकण्याचा पराक्रम करणारा उमर इलेव्हन पहिलाच संघ.
पहिल्या दिवशी दोन सामन्यांत पाच विकेट घेत अनिकेत सानपने सुप्रिमो चषकात सर्वाधिक विकेट घेणाऱयांच्या यादीत आपले पहिले स्थान कायम ठेवले. त्याने आजवर 27 विकेट घेतल्या आहेत.
मुन्ना शेखने रायगड इलेव्हनविरुद्ध 21 धावांची खेळी करत कृष्णा सातपुतेच्या 282 धावांना मागे टाकले. आता सुप्रिमो चषकात सर्वाधिक धावांचा (287) विक्रम मुन्ना शेखच्या नावावर नोंदला गेला आहे.
आजच्या सुप्रिमो लढती
बालाजी पंधारी किंग्ज वि. शौर्य हर्षित
उमेश इलेव्हन मुंबई वि. एफएम हॉसपेट
वरील दोन्ही सामन्यांतील विजेत्यांमध्ये लढत




























































