
सामना प्रतिनिधी । नांदेड
व्यवसायाभिमूख अभ्यासक्रमांसोबत रोजगाराशी निगडीत अभ्यासक्रम सुरू करणे, नियमित परीक्षा आणि वेळेवर निकाल या बाबींवर आपण लक्ष केंद्रीत केल्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उध्दव भोसले यांनी सांगितले. विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सेमिनार व्हावेत, त्या माध्यमातून जगामध्ये चाललेल्या घडामोडी विद्यार्थ्यांसमोर याव्यात हा आपला प्रयत्न असल्याचे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच ते पत्रकारांशी बोलत होते.
यावर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 25 व्या वर्षात पदार्पण करेल. कुलगुरुपद स्वीकारल्यानंतर काही नवे संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील विविध संकुलांच्या संदर्भात असलेल्या अडचणी व त्यातील फेरबदलाबाबत लवकरच निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले. रोजगाराशी निगडीत काही नव्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ संकुल व विद्यापीठाशी निगडीत असलेल्या महाविद्यालयात वेळेवर परिक्षा आणि त्यांचे वेळेवर निकाल देणे यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे ते म्हणाले. पेट परिक्षेत झालेला गोंधळ आणि त्याबाबत झालेले आरोप-प्रत्यारोपांच्या चौकशीसाठी समिती नेमल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही ते म्हणाले.




























































