राज्य सरकारच्या दुसऱ्या पत्रानंतर रेल्वे ट्रॅकवर, नवदुर्गांना आजपासून लोकल प्रवेश

घटस्थापनेपासून सर्वच महिलांना लोकल प्रवास करू द्या, असे विनंतीपत्र राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पाठवले. मात्र त्यानंतर काही ना काही कारण काढत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्ड या दोघांनीही कागदी घोडे नाचवले. अखेर सरकारने मंगळवारी खरमरीत स्मरणपत्र पाठवताच रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि त्यांचे बोर्ड ट्रकवर आले आणि उद्या बुधवारपासून महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली.

राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहूर्तावर महिलांसाठी लोकल ट्रेनची दारे उघडी करण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली होती. तसे पत्र आपातकालीन व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिवांनी रेल्वे बोर्डाला पाठवले होते. या मागणीवर रेल्वे बोर्डाची परवानगी घ्याली लागेल तसेच राज्य सरकारशी याप्रकरणी पुन्हा बैठक घेऊन चर्चा करावी लागेल असा पवित्रा मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला. तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर एकूण महिला प्रवाशांची संख्या कळल्याशिवाय तातडीने हा निर्णय लागू करता येणार नसल्याचे रेल्वेने म्हटले होते.

रविवारी आणि सोमवारी मंत्रालयात मुख्य सचिव आणि गृह सचिव यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ बैठकांनंतरही यावर निर्णय झाला नाही. अखेर राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी मंगळवारी पुन्हा मध्य आणि पश्चिम रेल्वेला स्मरणपत्र पाठवून 16 ऑक्टोबरच्या मदत व पुनर्वसन सचिवांच्या पत्राचा संदर्भ देत रेल्वेकडे मागणी केली. त्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना उपरती होत त्यांनी दुपारी ट्विटरद्वारे उद्यापासून सर्व महिलांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देत असल्याचे घोषित केले. त्यात त्यांनी रेल्वेची नेहमीच तयारी असल्याचा दावा करीत मंगळवारी मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत असल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या