मराठवाडा नव्हे अवकाळवाडा! पावसाचे धूमशान, गारपिटीने झोडपले; आंबा, गहू, हरभर्‍याचे अतोनात नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा आणि अवकाळी असे आता समीकरणच रूढ झाले आहे. दोन दिवसांपासून बेमोसमी पावसाने मराठवाड्याचे बेहाल केले आहेत. पावसाचे धूमशान आणि वरून गारपिटीच्या मार्‍याने आंबा, गहू तसेच केळी, कापूस, हरभर्‍याचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी अक्षरश: रस्त्यावर आला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात वीज पडून तीन जण जखमी तर एका बैलाचा मृत्यू झाला.

हवामान खात्याने मराठवाड्यात अवकाळीसह गारपिटीचा इशारा दिला आहे. हा अंदाज खरा ठरवीत अवकाळी पावसाने दोन दिवसांपासून मराठवाड्यात मुक्काम ठोकला आहे. दुपारी नांदेड जिल्ह्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. बारड येथील राज्य महामार्गाच्या कार्यालयात गारांचा खच साचला. हदगाव तालुक्यात वीज पडून गणपत परसराम नाव्हेकर, परसराम हुजाजी सरकुंडे आणि पांडुरंग परसराम नाव्हेकर हे गंभीर जखमी झाले. लोहा तालुक्यातील धनज येथे माधव काळबा शिंदे यांचा बैल वीज पडून ठार झाला. बारड, पाथरड, पाटनूर, मुगट, मुदखेड आदी परिसरातही जोरदार पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, हिंगोली व वसमत तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे तर हिंगोली शहरासह जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील काही भागांत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. बीड जिल्ह्यात सकाळपासूनच ढगांचा गडगडाट सुरू होता. जिल्ह्यात वारे वाहत असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली. परभणी व धाराशिव जिल्ह्यांत मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण होते. जालना जिल्ह्यात तळणी येथीही तुफान गारपीट झाली. परिसरातही पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले.