
सामना ऑनलाईन। लखनौ
यूट्यूबवर प्रसूतीचा व्हिडीओ बघत मुलाला जन्म देण्याचा प्रयत्न करताना एका 25 वर्षीय अविवाहीत तरुणीचा व नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. ही भयंकर घटना उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे रविवारी घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
संबंधित तरुणी मूळची बहराईच येथील रहिवासी होती. पण गेल्या चार वर्षांपासून ती गोरखपूर येथे राहत होती. ती पदव्युत्तर परीक्षेची तयारी करत होती. चार दिवसांपूर्वीच तिने बिलंदपूर भागात भाड्याने घर घेतले होते. रविवारी तिच्या घराच्या दरवाजातून रक्ताचे ओहळ बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. यामुळे हादरलेल्या शेजाऱ्यांनी याबद्दल पोलिसांना कळवले. त्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तिच्या घराचा दरवाजा तोडून आता प्रवेश केला असता तरुणी व एक नवजात बालक रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत जमिनीवर पडल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी अविवाहीत होती व गर्भपात करण्यास तयार नव्हती. पण ते मूल नक्की कोणाचे याबद्दल तिने घरातल्यांना सांगितले नव्हते. यावरून घरात तिचा आई वडिलांबरोबर वादही होत असे. यामुळेच तिने भाड्याने घर घेतले व एकटी राहू लगली. मुलाला जन्माला घालण्यासाठीच तिने भाड्याचे घर घेतले होते. पण प्रसूती वेदना सुरू होताच तिने डॉक्टरांना न बोलावता यूट्यूबर प्रसूतीचा व्हिडीओ बघत स्वत:ची प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. तिने बालकाला जन्मही दिला. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे तिचा व बालकाचा मृत्यू झाला अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी रवि राय यांनी दिली आहे.
























































