
संवेदनशील असलेल्या मोरा बंदराच्या जेट्टीवरील सातही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार मागणी करूनही या कॅमेऱ्यांची दुरुस्ती होत नसल्याने संपूर्ण मोरा बंदराची सुरक्षाच क्षाच धोक्यात आली असून एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल उरणवासियांनी केला आहे. मोरा बंदराच्या परिसरातच जेएनपीए, ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस असे विविध प्रकल्प असून सीसी कॅमेरेच नसल्याने तेथील सुरक्षा देखील वाऱ्यावर असल्याचे दिसून आले आहे.
उरणचे मोरा बंदर सागरी वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते. या बंदरामध्ये राज्यभरासहगुजरातमधून देखील हजारो मच्छीमार बोटींचा वावर असतो. त्यामुळे डिझेल तस्करांचा देखील सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर झाला आहे. दहशतवादी कारवाया आणि डिझेल तस्करी व अन्य संशयास्पद हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी प्रशासनाने जेट्टीवर सात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. पण ते बंद पडल्याने बंदराचा कारभार रामभरोसे झाला आहे. मोरा बंदराच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना यासंदर्भात लेखी पत्र पाठवले. पण त्याकडे महिना उलटला तरी अद्याप लक्ष देण्यात आलेले नाही.
लवकरच दुरुस्ती करू मोरा बंदराच्या जेट्टीवरील
सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी तातडीने लक्ष घालून कॅमेऱ्याची दुरुस्ती करण्यात येईल असे एमएमबीचे डेप्युटी इंजिनिअर राजू झपाटे यांनी सांगितले.
असा झाला पर्दाफाश
मोरा बंदरात नेहमीच बोटींच्या दुरुस्तीचे काम चालते. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एक मच्छीमार आपल्या दुचाकीवर कापडी पिशवी लावून दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी आला होता. काही क्षणातच ही पिशवी गायब झाल्याचे दिसून आले. या मच्छीमाराने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण हे कॅमेरेच बंद असल्याचे दिसून आले