
किरणोत्सर्ग सोडणारे व मानवी जीवितास हानीकारक असलेल्या अतिशय धोकादायक अशा युरेनियमचा साठा करणाऱया दोघांना दहशतवादविरोधी पथकाच्या नागपाडा युनिटने पकडले आहे. आरोपींकडून तब्बल सात किलो 100 ग्रॅम वजनाचा युरेनियमचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. इतके युरेनियम आरोपींनी आणले कुठून, ते कोणाला विकणार होते, त्याचा वापर नेमका कशासाठी करणार होते याचा पोलीस आता शोध घेत आहेत.
शासनाने प्रतिबंधित केलेले असतानाही एक इसम युरेनियम विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती एटीएसच्या नागपाडा युनिटचे प्रभारी निरीक्षक संजय भालेकर यांना मिळाली होती. त्यानुसार 14 फेब्रुवारी रोजी त्यांनी जिगर पंडया याला पकडले होते. त्यावेळी त्याच्याकडे युरेनियमचे काही तुकडे मिळाले होते. त्यामुळे भालेकर यांनी आणखी खोलात जाऊन पंडयाची चौकशी केल्यावर त्याला हे युरेनियमचे तुकडे मानखुर्द येथे राहणारा त्याचा मित्र अबू ताहिर याने दिल्याचे समोर आले. त्यानंतर भालेकर यांनी एपीआय प्रशांत सावंत तसेच अंमलदार मुल्ला, धावले, पांडे व पथकाने मानखुर्दमध्ये शोधमोहीम राबवून अबू ताहिर अफजल चौधरी याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर त्याने गोवंडी, मंडाला येथे एका गाळ्यात युरेनियमचा साठा करून ठेवल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी त्या गाळ्यावर छापा टाकल्यावर तेथे तब्बल सात किलो 100 ग्रॅम वजनाचा मानवी जीवितास अत्यंत धोकादायक असलेल्या युरेनियमचा साठा मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या युरेनियमची किंमत 21 कोटी 30 लाख रुपये इतकी असल्याचे एटीएसचे पोलीस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी सांगितले. पंडया आणि ताहिर या दोघांनाही बुधवारी अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता 12 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बीएआरसीकडून धोकादायक असल्याचे स्पष्ट
अबू ताहिर याच्याकडे युरेनियमचा साठा मिळाला. पण ते युरेनियम आहे यावर तेव्हा पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तो साठा तपासणीसाठी बीएआरसीकडे देण्यात आला. बीएआरसीकडून तपासणी झाल्यानंतर ते नैसर्गिक युरेनियम असून ते अत्यंत धोकादायक असल्याचा अभिप्राय देण्यात आला.

























































