प्रवाशांची रांगेतून मुक्तता, UTS ॲपमधून रेल्वे पास आणि तिकीट काढता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य सरकारने UTS मोबाईल ॲप आणि युनिव्हर्सल ॲप पास पोर्टल लिंक केले आहे. त्यामुळे प्रवाशांची तिकिट रांगेतून सुटका झाली असून आता प्रवाशांना UTS ॲपवरून तिकीट आणि पास काढता येणार आहे. आता तिकीट किंवा पास काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडकीवर जाण्याची गरज नाही. आजपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरच प्रवाशांना मासिक पास दिला जात होता. त्यानंतर रेल्वेने तिकीट देण्यासही सुरूवात केली होती. परंतु UTS ॲप सुरू न झाल्याने रेल्वे स्थानकावरील खिडक्यांवर प्रवाशांची गर्दी होत होती. आता UTS अॅप सुरू झाल्याने ही गर्दी कमी होणार आहे.

ज्या प्रवाशांनी आधीच UTS app डाऊनलोड करून यापूर्वी पास किंवा तिकीट काढले असेल अशा ग्राहकांनी आपला युनिव्हर्सल पास लिंक करणे बंधनकारक आहे. तसेच नव्याने अ‍ॅप डाऊनलोड केलेल्या युजरने लॉग इन करून आपला युनिव्हर्सल पास लिंक केल्यास त्यांना तिकीट आणि पास मिळणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला युनिव्हर्सल पास मिळतो. हा पास UTS ॲपशी लिंक केल्यानंतर प्रवाशांना रेल्वेचे तिकीट आणि मासिक पास मिळणार आहे.