मोनेगिरी : परोपकारी केशवराव

>>संजय मोने

साधारण शरीरयष्टी, विरळ होत चाललेले, पण व्यवस्थित मागे वळवलेले आणि चापूनचोपून बसवलेले केस, फिकट निळा, जो एकेकाळी गडद निळा असावा असा शर्ट. अनेक वर्षे केशवराव कलाकारांची सेवा करत होता…निर्विकार चेहऱयाने! कुठल्याच भावना त्याच्या चेहऱयावर उमटत नसायच्या. कोणी काही चौकशी केलीच तर तो उत्तरादाखल कपाळावर एक बोट फिरवून ‘नशीब!’ या अर्थाची खूण करायचा. अनेक वर्षे केशवराव कलाकारांची सेवा करत होता…निर्विकार चेहऱयाने! कुठल्याच भावना त्याच्या चेहऱयावर उमटत नसायच्या. कोणी काही चौकशी केलीच तर तो उत्तरादाखल कपाळावर एक बोट फिरवून ‘नशीब!’ या अर्थाची खूण करायचा.

सुमारे तीसेक वर्षांपूर्वी केशवराव या व्यक्तीला मी पहिल्यांदा भेटलो. साधारण शरीरयष्टी, विरळ होत चाललेले, पण व्यवस्थित मागे वळवलेले आणि चापूनचोपून बसवलेले केस, फिकट निळा, जो एकेकाळी गडद निळा असावा असा शर्ट. वैविध्याची आवड असल्यासारखं प्रत्येक बटण वेगळय़ा रंगाचं. नाटय़गृहाच्या अगदी बाजूला प्रयोगासाठी बाहेरगावाहून आलेल्या कलाकारांना राहण्याची सोय असलेलं एक लॉज. सगळे तिथेच मुक्कामाला उतरायचे. साधं, फारशा सुविधा नसलेलं ठिकाण. दोन पलंग, एक पंखा, जो बंद आणि पूर्ण वेग अशा दोनच स्थितीत चालू असायचा. जेवणाची व्यवस्था सोडाच, चहासुद्धा मिळायचा नाही. आदल्या प्रयोगानंतर रात्रभर प्रवास करून भल्या पहाटे मुक्कामाला पोहोचायचं. सकाळी जाग आली की, चहा प्यायला खाली उतरायचं जिवावर यायचं. तिथे हा आधी वर्णन केलेला माणूस हजर असायचा. सुरुवातीला वाटलं होतं, ‘केशवराव’ हे मानाचं संबोधन असावं. काही वेळा तिथे राहण्याची वेळ आली तेव्हा कळलं, तो केशवराव होता. चहा, सकाळचं खाणं, जेवण, कोणाला तरी लागणारी पानं, सिगारेट्स, क्वचित कधीतरी इतर द्रव्यंही तातडीने हजर करायचा. ही सगळी सेवा पुरविल्याबद्दल तो एकही पैसा मागत नसे. कोणी आपणहून दिले तर एक आशीर्वाद पुटपुटून ते तो खिशात टाकत असे. अनेक वर्षे आम्ही त्याला एकाच निळसर शर्टात आणि मळखाऊ रंगाच्या पॅण्टमध्ये पाहत होतो. तो कपडे धुवायचा कधी, सुकवायचा कधी हे कोडंच होतं. एक मात्र नक्की कपडय़ांना कधी वास येतोय, मळलेत असं अजिबात नसायचं. चेहरा कायम हसतमुख. बरं, उत्पन्नाचं काय? आपला खर्च तो कसा भागवत असेल? कलाकारांनी दिलेल्या पैशांत तर अशक्य होतं. कारण कलाकारांचीच खर्चाची तोंडमिळवणी जेमतेम व्हायची. ‘मालिका’ नावाच्या घाऊक उत्पादनाची नुकतीच सुरुवात झाली होती. केशवराव काय आणि कसा जगत असेल याची चौकशीही कोणी केली नसावी. वरिष्ठ कलाकारांना विचारलं तर उत्तर मिळालं नाही. केशवराव मूळचा कुठला याचं उत्तर ‘मूळ कर्नाटकातला, आधी कधीतरी तो तिथून या शहरात आला’ इतपंच मिळालं. त्याचं कुटुंब, मुलंबाळं याबद्दलही कोणाला माहीत नव्हतं. कुणाला त्याची जरुरीच वाटली नाही. एक आयता काम करणारा माणूस उपलब्ध आहे, त्याची उगाच अधिक चौकशी करून बिलामत कशाला चिकटवून घ्यायची? अनेक वर्षे केशवराव कलाकारांची सेवा करत होता…निर्विकार चेहऱयाने! कुठल्याच भावना त्याच्या चेहऱयावर उमटत नसायच्या. कोणी काही चौकशी केलीच तर तो उत्तरादाखल कपाळावर एक बोट फिरवून ‘नशीब!’ या अर्थाची खूण करायचा. पाच-सहा वर्षं तरी त्याला मी प्रयोग असला की, पाहात होतो. कुठल्या कलाकाराला काय खायला आवडतं, चहा की कॉफी, त्यात साखर किती, कोण बिनसाखरवाले, जेवणात काय काय आवडतं किंवा नाही हे त्याला अचूक माहीत होतं. नाटकाच्या प्रयोगाला मात्र तो नेमाने हजेरी लावायचा. एखादं नाटक आवडलं तर ते तो मन भरेपर्यंत बघायचा. मध्यांतरात बाहेर प्रेक्षागृहात चक्कर मारून त्यांचा प्रतिसाद काय आहे याचा अंदाज त्याच्या आवडत्या कलाकाराला द्यायचा. असंख्य नाटपं बघून बघून नाटक चालेल की नाही, याचे ठोकताळे बांधायचा आणि ते अतिशय अचूक असायचे. त्यामुळे काही नामवंत कलाकार त्याचं मत जाणून घ्यायला उत्सुक असायचे आणि तोही अत्यंत निर्भीडपणे मत मांडायचा. मीही त्याला नंतर विचारायला लागलो आणि त्याने सांगितलेला होरा खरा ठरला. असंच एक नाटक होतं.
त्याच्याबद्दल सगळय़ा वर्तमानपत्रांत अत्यंत प्रतिकूल परीक्षण छापून आलं होतं. एकजात सगळय़ा वर्तमानपत्रांनी नाटकाला सोलून काढलं होतं. पुढच्या प्रयोगाला निर्माता हजर होता. केशवरावने त्याला स्वःखर्चाने चहा पाजला आणि म्हणाला,
‘‘साहेब! तुमच्या नाटकाचे एक हजार प्रयोग होणार’’ निर्माता त्या सगळय़ा टीकेमुळे चिंतेत होता. काहीसा चिडून तो म्हणाला,
‘‘केशव, कालची नशा उतरली नाही वाटतं?’’
‘‘साहेब! कालची नाही, गेल्या आठवडय़ात तुमचा प्रयोग पाहिला, ती उतरली नाहीये. हजार प्रयोगाची पैज लावतो मी, पण माझ्याकडे हरायला माझ्या या आयुष्याशिवाय दुसरं काहीच नाहीये आणि त्याचा तुम्हाला उपयोगही होणार नाही.’’

निर्माता निरुत्तर झाला आणि त्या नाटकाचे खरोखरच हजार प्रयोग झाले. निर्मात्याने लक्षात ठेवून त्या काळात केशवला पाच हजार रुपये दिले. ‘‘साहेब! ठेवू कुठे? या खिशाशिवाय दुसरी जागा नाही माझ्याकडे आणि त्यात इतके पैसे राहणार नाहीत. त्यापेक्षा आज तुम्ही मला एक चहा पाजा.’’

त्यानंतर मग मी मालिकांत काम करू लागलो. नाटय़ व्यवसायाची आर्थिक गणितंही बदलली. कलाकार वातानुकूलित हॉटेलांत राहायला लागले. ते सगळं प्रत्येक नाटकाला परवडायचं असं नाही, पण पायंडा पडला आणि रुळला. तिथे बेल दाबून किंवा पह्न करून सगळं मिळायला लागलं. शिवाय, बरेचदा कलाकार स्वतःची गाडी घेऊन यायचे आणि प्रयोग संपल्यावर लगोलग परत जायचे. साहजिकच केशवरावची गरज लागेनाशी झाली. आज हा लेख लिहिण्याचं कारण म्हणजे बऱयाच वर्षांनी केशवराव मला भेटला. थोडा म्हातारा झालेला, चाल मंदावलेली, पण वेष, थाट उत्तम होता. आधीच्या केशवरावपेक्षा पार वेगळा! पायात उत्तम बूट होते, करकरीत चमकणारे. शहरात फिरत असताना दिसला. त्यानं मला ओळखलं.
‘‘काय करता?’’ मी विचारलं.
‘‘मस्त, झकास.’’
‘‘नक्की?’’
‘‘हो, हो.’’ कपाळावर बोट फिरवीत म्हणाला.
‘‘बदललं सगळं.’’
‘‘काय?’’ तो अचानक बोलू लागला. दीड तास तो बोलत होता.

चांगला श्रीमंत होता तो. धारवाडात व्यवसाय होता. मोठं घर होतं. बायको फार लवकर गेली. दोन मुली होत्या. आता निवृत्त व्हावं असं ठरवून सगळा व्यवसाय मुलींच्या नावावर केला आणि नशीब फिरलं. मोठय़ा मुलीचा नवरा परदेशात होता, केशवचा लाडका जावई. दोन्ही मुलींनी आणि धाकटय़ा जावयाने सगळय़ावर कब्जा करून त्याला घराबाहेर काढलं. गावगन्ना फिरत तो या शहरात आला. हळूहळू असलेला पैसा संपला. कुणासमोर हात पसरायची सवय नव्हती. त्या काळात ‘नटसम्राट’ नाटक अनेक वर्षांनी पुन्हा मंचित झालं होतं. थेट केशवची कहाणी. प्रयोग पाहून तो आतून हलला. आत जाऊन त्याने नायकाला सांगितलं, ‘‘असं कुठल्याही बापानं वागू नये अशी नाटकाच्या आधी घोषणा करा!’’ पुढे नाटकाची गोडी वाढत गेली. आपली व्यथा हुबेहूब मांडणाऱया कलाकारांबद्दल माया वाटायला लागली.

‘‘मग हे सगळं बदललं कधी?’’
‘‘मोठय़ा जावयापासून सगळय़ांनी लपवून ठेवलं होतं. बाबा घर सोडून गेले असं सांगितलं. अचानक तीन वर्षांपूर्वी जावयाने मला पाहिलं. रागाच्या भरात त्याने इतरांबरोबरचे संबंध तोडून टाकले. तो इथेच व्यवसाय करतो. मी त्याच्या बरोबर टेचात राहतो. आता तो आणि मी हेच आमचं कुटुंब. माझ्या बाजूने मी परतफेड करतो. कशी सांगू? रोज सकाळी त्याला माझ्या हातचा चहा पाजतो. तुमचं कसं काय चाललंय?’’
मी उत्तरादाखल कपाळावर बोट फिरवलं.
‘‘मस्त’’ हसून तो म्हणाला,
‘‘मी माझी गोष्ट फक्त तुम्हालाच का सांगितली माहीत आहे? कारण तेव्हा तुम्हाला चहा आणून दिल्यावर कायम अर्धा मला देत होतात.’’ …आणि मी काही बोलायच्या आत तो ‘टाक टाक’ असा बुटांचा आवाज करत निघून गेला…कायमचा!

(लेखक ज्येष्ठ अभिनेते आहेत.)