काँग्रेसच्या पहिल्या यादीत 50 महिला, उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पहिली यादी जाहीर केली. यादीतील 125 उमेदवारांपैकी 50 महिलांना तिकीट देण्यात आले असून यात सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार, अभिनेत्री यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागा असून सात टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 10 फेब्रुवारीपासून निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत महिलांना प्राधान्य दिले. उमेदवारांमध्ये 40 टक्के महिला आणि 40 टक्के युवा वर्ग आहे. उमेदवारांमध्ये माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद, काँग्रेसच्या आराधना मिश्रा, चिरहरणकांडच्या रितू सिंह, मानधनासाठी आंदोलन करणार्या आशा वर्कर पूनम पांडेय, पंखुडी पाठक, 2018 मध्ये बिकिनी किताब जिंकणार्या अर्चना गौतम, एनआरसी-सीएएचा विरोध करणाऱया सदफ जफर यांचा समावेश आहे.

उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला उमेदवारी

यात देशभर गाजलेल्या उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही उमेदवारी देण्यात आली आहे. ज्या सत्तेचा आधार घेत उन्नावच्या बेटींबरोबर अत्याचार झाला आता तीच सत्ता मिळवून आपला संघर्ष पुढे सुरू ठेवता येणार आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. दरम्यान, राहुल गांधी यांनीही ट्विट करत उन्नावमध्ये भाजपने ज्या मुलींबरोबर अन्याय केला. त्याच आता न्यायाचा चेहरा बनतील. आम्ही लढू आणि जिंकूच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दलित महिलांना अधिक प्राधान्य

काँग्रेसने ज्या 50 महिलांना तिकीट दिले आहे त्यापैकी 36 टक्के महिला या दलित समाजातील आहे. त्या खालोखाल 20 टक्के महिला इतर मागास वर्गीय आणि ब्राह्मण समाजातील, 12 टक्के महिला या मुस्लीम, 10 टक्के ठाकूर आणि 2 टक्के महिला या शीख समाजातील आहेत.