ढाब्यावर वेटरसोबत झाला वाद, जन्मदिवसच ठरला त्याचा मृत्यूदिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेशच्या गाझीपूरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिथल्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादात जीव गमवावा लागला आहे. त्याचा वाढदिवसच त्याचा मृत्यूदिवस ठरल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

विजय प्रताप यादव असे मृत तरुणाचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील तुलसीनगर परिसरात ही घटना घडली आहे. विजयचा बुधवारी 10 मार्च रोजी वाढदिवस होता. विजय जौनपुर जिल्ह्यातील चंदवक येथे ग्राम विकास अधिकारी म्हणून काम करत होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी विजय चंदवक येथून सुट्टी घेऊन गाझीपूरला आला होता.

संध्याकाळी तो भाऊ, काकांची मुले आणि काही मित्रांना घेऊन कालिका ढाब्यावर जेवायला गेला होता. मात्र जेवण वाढताना तिथल्या कर्मचाऱ्याशी विजयने वाद घातला. दोघांमधला वाद विकोपाला गेला. त्यावेळी तिथल्या कर्मचाऱ्यांनी ढाबा मालकासमोर विजय आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला. या हल्ल्यात विजय जबरदस्त जखमी झाला. त्याला तिथल्या खासगी रुग्णालयात तत्काळ नेण्यात आले. मात्र त्याची स्थिती गंभीर असल्याने त्याला बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. मात्र त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी विजयच्या कुटुंबाने त्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली आहे, त्याची दखल घेत पोलिसांनी ढाबा मालकासह चार लोकांना ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळावरुन कोल्ड ड्रींकच्या तुटलेल्या बाटल्या आणि रॉड्स मिळाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे एसपी डॉ.ओपी सिंहने सांगितले.