
खासगी कंपनीत काम करणार्या एका उच्चशिक्षित तरुणीला दर्ग्यावर नमाज अदा करण्यासाठी उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. नमाज अदा करत असताना या तरुणीला पोलीस संरक्षण देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे या तरुणीने धर्म बदललेला नाही किंवा मुस्लिम तरुणाशी तिचा निकाहही झालेला नाही.
भावना असे या तरुणीचे नाव असून, तिचे वय 22 आहे. हरिद्वारच्या सिडकूल येथील एका खासगी कंपनीत ती काम करते. या कंपनीतच फरमान नावाचा तरुणही काम करतो. दोघांची मैत्री आहे. या दोघांना कलियर शरीफ या दर्ग्यावर एकत्र नमाज अदा करायची आहे. पण या ठिकाणी गेल्यानंतर काही संघटना मला विरोध करतात. त्यामुळे मला पोलीस संरक्षणात या दर्ग्यावर नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भावनाने उच्च न्यायालयाकडे केली होती. नमाज अदा करायला मिळणे हा घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असे तिने आपल्या याचिकेत म्हटले आहे.
न्या. मनोज तिवारी आणि न्या. पंकज पुरोहित यांच्या खंडपीठाने याचिकेवरील युक्तिवाद ऐकल्यानंतर भावनाला दर्ग्यावर नमाज अदा करण्याची परवानगी दिली. भावना नमाज अदा करत असताना तिला पोलीस संरक्षण देण्यात यावे, असे आदेशही या खंडपीठाने दिले.
नमाजचा प्रभाव असल्यामुळे…
खंडपीठाने भावनाला नमाज अदा करण्या’चे कारण काय अशी विचारणा केली. नमाजचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. मी हिंदूच आहे. मी मुस्लिम धर्म स्वीकारलेला नाही. मला धर्म बदलायचाही नाही. कोणतेही दडपण वा आर्थिक लाभामुळे मला नमाज अदा करायची नाही. मला नमाज अदा करायला आवडते, असे उत्तर भावनाने दिले.




























































