
मुस्लिमांच्या मदरशांमध्ये संस्कृत व वेदाचे ज्ञान देण्याचा मोठा निर्णय उत्तराखंडमधील मदरसा बोर्डानं घेतला आहे. असा ऐतिहासिक निर्णय घेणारे हे देशातील पहिले मदरसा बोर्ड असेल. त्यामुळे आता हिंदू संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेली संस्कृत भाषा व वेदांचे शिक्षण मदरशातून मिळणार आहे.
उत्तराखंड मदरसा बोर्डाने हा निर्णय घेतला असून उत्तराखंड मदरशा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनी आज याबाबत घोषणा केली. कासमी यांनी इथल्या साबिर दर्ग्याला भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, “साबिर पाक यांचा दर्गा हा केवळ मुस्लिम समुदायासाठीच नाही तर प्रत्येक धर्माला मानणाऱ्या लोकांसाठी आस्थेचं प्रतिक आहे. उत्तराखंडमध्ये गाय, गंगा आणि हिमालयाच्या संरक्षणासाठी मुस्लिम समाज अभियान चालवेल तसेच मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणासह योग, वेद आणि भारतीय महापुरुषांचं आत्मचरित्र देखील शिकवलं जाईल, असे कासमी यांनी सांगितले.
जमीयत उलेमा हिंदचा विरोध
उत्तराखंड मदरशा बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाला जमीयत उलेमा हिंद या संघटनेचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद आरिफ कासमी यांनी विरोध केला आहे. “उत्तराखंड मदरशा बोर्डाच्या अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचा कडाडून विरोध करायला हवा. जमीयत कोणत्याही भाषा किंवा धर्माविरोधात नाही. पण अरबी मदरशांमध्ये संस्कृत आणि वेदांचं शिक्षण कुठल्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही” असा इशारा त्यांनी दिला आहे.




























































