
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी आणि सोलापूर या घाटमार्गावर चालवण्यात येणाऱ्या वंदे भारत ट्रेनला तब्बल 3600 घोड्यांचे बळ असणार आहे. सेमी हायस्पीड दर्जाची ही गाडी लोणावळा आणि कसारा घाटात अडकू नये, घाटमार्ग लीलया पार करता यावा म्हणून 16 डब्यांच्या या अत्याधुनिक गाडीला तब्बल 450 हॉर्स पॉवरच्या (अश्वशक्ती) आठ महाकाय मोटार लावण्यात आल्या आहेत. उपनगरीय लोकलचा विचार करता या गाडीला जवळपास तिप्पट ताकद आहे.
रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी रेल्वेकडून देशभरात वंदे भारत ट्रेन सुरू केल्या येत आहेत. सध्या आठ मार्गांवर या गाड्या चालवण्यात येत असल्यातरी प्रथमच घाटमार्गावर ही गाडी चालवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेने विशेष खबरदारी घेतली आहे. या गाडीची ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असली तरी सर्वसाधारण मार्गावर 100-120 किमी तर घाट परिसरात ताशी 55 किमी वेगाने चालवण्यात येणार आहे. या गाडीला लोकल ट्रेनच्या तुलनेत तिपटीहून अधिक क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटार लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाडीला 3600 हॉर्स पॉवर एवढी ताकद मिळणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे घाटात गाडीचा वेग कमी होणार असला तरी चढाई करताना कोणतीही अडचण येणार नाही.
डब्याच्या प्रत्येक चाकाला पार्किंग ब्रेक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी आणि सोलापूर या दोन्ही मार्गावर धावणाऱ्या गाडीला आवघड अशा कसारा आणि लोणावळा घाटातून जावे लागणार आहे. तसेच गाडीला पुश-पूलसाठी दुसरे इंजिनही लावले जाणार नाही. त्यामुळे या दोन्ही गाड्यांच्या डब्यांच्या प्रत्येक चाकाला पार्किंग ब्रेकची सुविधा देण्यात आली आहे. मात्र सध्या चालवण्यात येत असलेल्या कोणत्याही वंदे भारत ट्रेनच्या डब्याच्या प्रत्येक चाकाला पार्किंग ब्रेकची व्यवस्था नाही.
एक्प्रेस ट्रेनचे लोकोमोटिव्ह इंजिन – 6350 हॉर्स पॉवर
12 डब्यांची बंबार्डियर लोकल – 1248 हॉर्स पॉवर
मालगाडीचे लोकोमोटिव्ह इंजिन – 12000 हॉर्स पॉवर





















































