चित्रांजली उपक्रमातून वारली चित्रकृतींचा आविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

वारली चित्रकला जगभर पोहचविणारे जिव्या सोमा मशे यांच्या जयंतीनिमित्त नाशिक येथे ‘चित्रांजली’ उपक्रम राबविण्यात आला. यात सहभागी कलारसिक व विद्यार्थ्यांनी रांगोळी, कॅनव्हॉस, भांडी, कागद, झाडांची पाने यांच्यासह चक्क कारवरही वारली चित्रे रंगवीत या कलेचा आनंद घेतला. यामुळे मविप्र संचलित आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्रांगण दोन दिवस चित्रमय वातावरणात रंगून गेले.

वारली चित्रशैलीचे अभ्यासक व पत्रकार संजय देवधर यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. साहित्य, विषय, आकार, रंगसंगती याबाबत कोणतेही बंधन नसलेला मुक्ताविष्कार ही या उपक्रमासाठीची संकल्पना होती. या उपक्रमाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रेमदा दांडेकर यांनी प्रवेशद्वारावर भव्य वारली रांगोळी रेखाटली. विलास देवळे या युवकाने मोराचे सुंदर चित्र, तर अभियंता हर्षद थविल याने वारली संस्कृती चित्रबद्ध केली. महेंद्र भोये याने जिव्या मशे यांचे व्यक्तिचित्र साकारत त्यांच्या जीवन प्रवासाला सलाम केला. श्वेता गरे हिने वारली चित्रशैलीत दशावतार चित्रीत केले. ऍड. अपूर्वा भांडारे हिने सर्वधर्मसमभाव चित्रातून व्यक्त केला. याशिवाय स्वाती मोरे, उत्कर्षा जोशी, मीनाक्षी राऊत, सोमनाथ चव्हाण, ऋतुजा कदम, कविता चिपळूणकर, नेहा बर्वे, जान्हवी पाठक, हर्षा रामोळे यांनीही विविध चित्रे साकारली.

आदिती पळसुले हिने चक्क कारवरच वारली चित्रे रंगविली. या विद्यार्थ्यांनी दोन दिवस या चित्रकलेचा आनंद घेत उपस्थितांना निसर्ग आणि आदिवासी जीवनशैलीचे दर्शन घडविले. या उपक्रमात सहभागी कलाकारांना प्राचार्य प्राजक्ता बस्ते यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.