
>> वर्णिका काकडे
जिथे प्रशिक्षित गिर्यारोहकांचाही कस लागतो ते महाराष्ट्राचे एव्हरेस्ट, म्हणजेच कळसूबाई शिखर सर करणारी राजवर्धिनी प्रसाद चव्हाण. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या अंगाखांद्यावर बागडणारी ही चिमुकली शिवरायांचे संस्कार रुजवत आहे.
ज्या वयात दुडूदुडू धावायचे व आपले हट्ट पुरवून घ्यायचे, त्या वयात महाराष्ट्राचा अभिमान असलेले गडकिल्ले सर करीत अनोखा विक्रम प्रस्थापित करणारी राजवर्धिनी प्रसाद चव्हाण. महाराष्ट्राची मान आणि शान वाढवणारी ही महाराष्ट्र कन्या, जिने अवघ्या 1 वर्ष, 11 महिने आणि 15 दिवसांच्या वयात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई शिखर यशस्वीरीत्या सर करून आश्चर्यकारक विक्रम प्रस्थापित केला आहे. या अल्पवयात अशी कामगिरी करणारी ती एकमेव गिर्यारोहक ठरली असून तिच्या या पराक्रमाची नोंद ‘गिनीज बुक रेकॉर्डस्’ यांनी घेतली आहे. तिच्या धाडसाने आणि जिद्दीने सर्वांना प्रेरणा दिली असून महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
तिच्या ट्रेकिंगची सुरुवात 24 ऑक्टोबर 2024 रोजी झाली. 1 वर्ष 7 महिने या वयात तिने सिंहगड ट्रेक पूर्ण केला. आई-बाबांसोबत कडेवर असलेली राजवर्धिनी खाली उतरली आणि पायी चालत तिने सिंहगड परिक्रमा पूर्ण केली. अगदी तेव्हापासून तिची पावलं गडकिल्यांची माती पायास लागावी यासाठी जणू सरावली. तिच्या आई-वडिलांनीही तिच्यातील हे गुण हेरले. गडकिल्ल्यांविषयीची तिची आवड ओळखून पालकांनी वेगवेगळ्या गडाला भेट दिली. राजवर्धिनीने आजवर तब्बल 56 किल्ले सर करून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
राजवर्धिनीच्या या आगळ्या ध्यासामागे वडील प्रसाद चव्हाण आणि आई अमिता यांची प्रेरणा आहे. याचे कारण ती अवघ्या दहा महिन्यांची असतानाच आई-वडिलांनी तिला किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घडवण्यासाठी नेले होते. तिच्या हाताला लागलेली पहिली मातीही शिवरायांच्या समाधी स्थळाचीच. तिचा दुर्गप्रवास अविरत सुरू आहे. पुढे 1 वर्ष 11 महिन्यांची असताना तिने पहिल्या पायरीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापर्यंतचा संपूर्ण प्रवास पायी पूर्ण करत शिवनेरी किल्लाही सर केला. त्यानंतर अवघड श्रेणीतील बलाढय़ असा किल्ले रायगड हाही सहजतेने पायी सर केला.
महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’ म्हणून ओळखले जाणारे कळसूबाई शिखर तिने अवघ्या 1 वर्ष 11 महिने 15 दिवसांच्या वयात यशस्वीपणे सर करून नवा इतिहास घडवला आणि एवढय़ा अल्प वयात असा पराक्रम करणारी ती एकमेव आहे. राजगड, लोहगड, विसापूर, पन्हाळा व जलदुर्ग प्रकारातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि गिरीदुर्ग, बहादूरगड, बागणी, मिरजचा किल्ला, मोहोळ गढी हे भुईकोट किल्ले, प्रतापगडसारखा अवघड वनदुर्ग, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर हे तिने लीलया सर केले आहेत.
युनेस्कोने नुकतेच ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या मराठा साम्राज्याच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करणाऱया महाराष्ट्रातील 11 आणि तामीळनाडूमधील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा प्रदान केला आहे. सह्याद्रीच्या दुर्गम भौगोलिक रचनेत उभारलेले हे किल्ले मराठा साम्राज्याच्या रणनीती, वास्तुकला आणि लष्करी व्यवस्थेचे अद्वितीय प्रतीक मानले जातात. या सर्व 12 युनेस्को नामांकित किल्ल्यांची वयाच्या अवघ्या तीन वर्षांच्या अल्पवयात यशस्वी चढाई पूर्ण करणारी राजवर्धिनीही एकमेव आहे.
अवघ्या तीन वर्षे वयातील या अद्वितीय पराक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये तब्बल दोन वेळा करण्यात आली आहे. भारतातील सर्वात कमी वयाची ट्रेकर म्हणून आता ती ओळखली जाते. सुमारे चारशे वर्षांनंतर रायरेश्वर मंदिर येथे झालेल्या जीर्णोद्धारानंतरच्या कलश स्थापनेच्या वेळी पहिल्या कलश पूजनाचा मान राजवर्धिनीला मिळाला. धारेश्वर महाराजांनी रायरेश्वरावर झालेल्या 380 व्या शिवस्वराज्य शपथ दिन कार्यक्रमात तिचे नामकरण ‘जिजाऊ’ असे करून कुटुंबाचा सन्मान वाढवला.
अवघ्या लहान वयात गडदुर्गांची ओळख करून इतिहासाशी नाळ जुळवणारी, शिवरायांचे संस्कार रुजवणारी राजवर्धिनी आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.





























































