
सामना प्रतिनिधी, वसई
वसई-विरारच्या गटारांवर लावण्यात आलेली झाकणे चक्क मुंबई महापालिकेची असल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक म्हणजे झाकणांवरची मुंबई महापालिकेची ओळख पुसण्यासाठी ठेकेदाराने हातचलाखी करत नावे मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही ठेकेदाराच्या बनवाबनवीचा पर्दाफाश झाला असून ‘चोरीचा मामला’ म्हणत शहरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील विरार पूर्व मनवेलपाडा विभागात काही गटारांवरील चेंबरवर एम.सी.जी.एम. (म्युन्सिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई) अशी अक्षरे असलेली झाकणे लावण्यात आली आहेत. ही झाकणे लावताना कंत्राटदाराने कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून या झाकणांवरील एम. आणि जी. ही अक्षरे काढली आहेत. त्यामुळे या गटारांचे काम नेमके कोणत्या महानगरपालिकेने केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतकेच नव्हे तर वसई-विरार महानगरपालिकेच्या कंत्राटदाराने मुंबई महानगरपालिकेची झाकणे चोरून आणली, असा शालजोडीतला विनोदही सध्या सोशल मीडियावर हाणला जात आहे.
पालिकेचे अभियंता अनभिज्ञ
एम.सी.जी.एम. ही अक्षरे असलेली झाकणे मुंबई महानगरपालिकेची असल्याचे वसई-विरार महानगरपालिकेचे शहर अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले. मात्र ठेकेदाराने ती कोणकोणत्या प्रभागात लावली याची सविस्तर माहिती त्यांच्याकडे नव्हती.




























































