
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत फाटा – शिरडशहापूर या रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून रखडले असून यामुळे नांदेड व हिंगोलीच्या हजारो वाहनधारकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. नांदेडहून हिंगोली जिल्ह्यातील वसमत मार्गे जाणाऱ्या शेकडो वाहनधारकांना या रखडलेल्या कामामुळे अधिकचा वेळ खर्च करावा लागत आहे. कर्नाटकातील एका खासदाराशी संबंधीत कंस्ट्रक्शन कंपनीला हे काम बहाल करण्यात आले असून काम पूर्ण करण्याची मुदत संपून देखील काम पूर्ण झाले नाही. मात्र, बांधकाम विभागाचे संबंधीत अधिकारी गुत्तेदाराची पाठराखण करत आर्थिक मलिदा लाटून वाहनधारकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. रखडलेल्या या कामामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
हिंगोलीहून दररोज नांदेडला तसेच वसमतला वाहनांव्दारे अनेक जण प्रवास करतात. तसेच नांदेडहून संभाजीनगरला जाण्यासाठी वसमत, शिरडशहापुर, औंढा नागनाथ जवळील जिंतुर टी-पॉईंट या मार्गाचा वापर नांदेडकरांना करावा लागतो. शिरडशहापुर ते वसमत फाटा हे आंतर २३ कि.मी.चे असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून या रस्त्याचे सिमेंटीकरण व डांबरीकरण करण्यासाठी तसेच या मार्गादरम्यानची इतर आवश्यक कामे करण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी अडीच वर्षापूर्वी मंजुर करण्यात आला. निविदा प्रक्रियेचा सोपस्कार पूर्ण झाल्यावर कर्नाटक राज्यातील एका खासदाराशी संबंधीत बांधकाम कंपनीला हे काम मिळाले.
सुरवातीला कामात आघाडी दाखवून रस्त्यालगतच्या शेकडो झाडांची कत्तल करत काम सुरु करण्यात आले. तसेच रस्त्याचे खोदकामही करण्यात आले. खोदलेल्या रस्त्यावर भराव टाकून काही प्रमाणात डांबरीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र, प्रामुख्याने चोंढी आंबा फाटा ते शिरडशहापुर दरम्यान दोन्ही बाजूंचा रस्ता मागील दिड वर्षापासून खोदून ठेवण्यात आला आहे. दिड वर्षापासून हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. दोन वर्षापूर्वी सुरु झालेले हे काम फक्त ५० टक्केच पूर्ण झाले आहे. बांधकाम विभागाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काम पूर्ण करण्याची मुदत १८ महिने अर्थात दिड वर्ष होती. मात्र, त्यापेक्षा अधिकचा कालावधी संबंधीत गुत्तेदाराने ओलांडल्याचे कार्यारंभ आदेशाची पाहणी केल्यावर पुढे येऊ शकते. दोन्ही बाजुचे रस्ते खोदूनही काम पूर्ण न झाल्यामुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच मागील काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे खोदलेल्या रस्त्यावर चिखल होऊन वाहने फसल्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील झाली होती. गतीने व दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न करताही बांधकाम विभागाकडून संबंधीताची पाठराखण केली जात आहे. नांदेड येथील महामार्ग बांधकाम विभागाच्या अखत्यारित व नियंत्रणाखाली हे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.


























































