चित्रा वाघ यांनी डॉ. रघुनाथ कुचिक यांना टार्गेट करण्यास सांगितले, पीडित तरुणीचा आणखी खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझा उपयोग करून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांना टार्गेट केले. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी मला खोटे आरोप करण्यास भाग पाडले, मात्र सत्यता लक्षात आल्यानंतर मी बाजू मांडली आहे. याप्रकरणी मी आता दबाव टाकणाऱयाविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे दोन दिवसांचा वेळ मागितल्याचा आणखी एक खुलासा पीडित तरुणीने केला आहे.

कथित बलात्कारप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांची भेट घेतली. त्यानंतर तिने दबाव टाकणाऱया संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. चित्रा वाघ आणि अंकलने माझ्या नावाचा गैरवापर करून मला कुचिक यांच्याविरुद्ध खोटे आरोपही करण्यास भाग पाडले आहे. आमचं नातं वेगळ्या वळणावर असताना चित्रा वाघ यांनीच गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी राजकीय फायदा उठवला. आमच्या नात्याचा अशा प्रकारे उपयोग करून हेतू साध्य केला आहे.

न्यायालयातून तक्रार मागे घेणार

माझे रघुनाथ कुचिक यांच्यासोबत वाद होते, मात्र त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करेपर्यंत मला विषय ताणायचा नव्हता. मात्र ओळखीतील मोहम्मद अहमद (अंकल) यांच्या वतीने भाजपच्या चित्रा वाघ यांनी प्रकरणात उडी घेऊन राजकीय हेतू साध्य केला. माझ्यावर दबाव टाकून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे मी आता न्यायालयातून ही तक्रार मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पोलिसांसोबत चर्चा करणार आहे.

चित्रा वाघ आणि पीआर पोलिसांच्या रडारवर

कथित बलात्कार प्रकरणात भाजपच्या चित्रा वाघ यांच्यासह आता पीआर आणि आयटी विभाग पोलिसांच्या रडारवर आले आहेत. संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तरुणीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेउन चित्रा वाघ, काही पीआर आणि आयटी विभागाने षड्यंत्र रचले होते का, यासंदर्भातही तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर तपासाला गती मिळणार आहे.