
आम आदमी पार्टीचे आमदार गुलाब सिंह यादव यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले. भाजपने या घटनेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात आपच्या कार्यकर्त्यांनी गुलाब सिंह यादव यांना कानाखाली मारल्याचे तसेच त्यांचा पाठलाग करून त्यांना चोपल्याचे दिसत आहे. तसेच या कार्यकर्त्यांपासून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी त्यांना पोलीस स्थानकात जावे लागल्याचे समजते.
भाजपने व्हिडीओ शेअर करत सोबत गुलाब सिंह यादव यांनी दिल्ली महानगरपालिका निवडणूकीच्या तिकीटी विकल्यामुळे त्यांना आपच्याच कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. तसेच आपच्या सर्व भ्रष्टाचारी आमदारांसोबत असंच होणार असल्याचा इशाराही भाजपने केजरीवालांना या पोस्टमधून दिला आहे. भाजपच्या दिल्लीतील बहुतेक नेत्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत केजरीवाल व आपची खिल्ली उडवली आहे.
पिट गए AAP के विधायक जी!
आम आदमी पार्टी विधायक गुलाब सिंह यादव को टिकट बेचने के आरोप में आप कार्यकर्ताओं ने दौड़ा-दौड़ा करके पीटा।
केजरीवाल जी, ऐसे ही AAP के सभी भ्रष्टाचारी विधायकों का नंबर आएगा। pic.twitter.com/MArpoSi3E5
— BJP Delhi (@BJP4Delhi) November 21, 2022
गुलाब सिंह हे दिल्लीतील मटियाल मतदारसंघाचे आमदार आहेत. दिल्लीत 1 ड़िसेंबर व 4 डिसेंबर रोजी महानगर पालिकेच्या निवडणूका होणार आहेत. त्यासंदर्भात आपची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून दोन गटात बाचाबाची झाली व अचानक कार्यकर्ते सिंह यांच्याशी वाद घालू लागले. काही वेळातच हा वाद चिघळला व कार्यकर्ते चक्क हाणामारीवर उतरले. कार्यकर्त्यांनी गुलाब सिंह यांना धक्काबुक्की करत कार्यालयाबाहेर काढले. त्यानंतर ते पळून जायचा प्रयत्न करत असताना देखील कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.



























































