दुर्गेश पाटीलचे ‘क्षितिजा परी’ गाणे प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दुर्गेश पाटील या उमद्या गायकाचा ‘क्षितिजा परी’ हा प्रेमगीताचा मराठी व्हिडीओ नुकताच अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. एम. सुधाकर फिल्म्स निर्मित हा म्युझिक व्हिडीओ दुर्गेशवरच चित्रित करण्यात आला आहे. या व्हिडीओतील गाणे देखील दुर्गेशनेच लिहलेले आहे. महेश मटकर यांच्या संगीताने नटलेल्या या व्हिडिओत दुर्गेशसोबत पूजा ठाकूर या अभिनेत्रीने काम केले आहे. हे गाणे युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओला प्रदर्शनानंतर काही तासातच हजारो लाईक्स मिळाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील दुर्गेश हा जितका साधा तितकाच आपल्या कामाशी प्रामाणिक आहे. त्याने या प्रेम गीताला पुरेपूर न्याय दिला असल्याचे या गाण्यातून दिसून येते. यावेळी दुर्गेश म्हणाला की, मी सहज म्हणून हे गाणे लिहिले, ते गाणे मी ज्यांना ज्यांना ऐकवले त्यांना ते आवडले म्हणून याचा व्हिडिओ करण्याचे ठरले. मला अभिनयाची आवड असल्याने मीच यात काम करायला तयार झालो. यानंतर अभिनयाकडेच जास्त लक्ष देणार असल्याचेही दुर्गेश म्हणाला. जळगाव ते मुंबईतील सिनेसृष्टीचा हा प्रवास तसा सोपा नाहीये पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचेही त्याने नमूद केले. क्षितिजा परी चा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेता अनिकेत विश्वासराव म्हणाला की, दुर्गेशचा आवाज हा मराठीसाठी दुर्मिळ असा आवाज आहे. दुर्गेश पाटीलच्या रूपाने मराठी सिनेमाला अरजित सिंग मिळाला आहे. कोणतीही गोष्ट खऱ्या आणि निर्मळ प्रेम भावनेतून केली तर सर्वांनाच भावते.

क्षितिजा परी हे प्रेम गीत कुलू मनाली सारख्या निसर्गरम्य आणि सुंदर अशा ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे, त्यामुळे हे गाणं अधिकच रोमँटिक झालं आहे, म्हणून ते १८ ते ३० वयोगटातील प्रेक्षकांना जास्त भावेल, असा मला ठाम विश्वास आहे, असं व्हिडिओ दिग्दर्शक एम. सुधाकर यांनी यावेळी सांगितले. एम.सुधाकर यांचा हा पहिलाच मराठी म्युजिक व्हिडिओ असला तरी त्यांनी यापूर्वी बॉलीवुडमध्ये वरून धवन, संजय दत्त सारख्या बड्या कलाकारांना कोरिओग्राफ केलं आहे.