
सामना प्रतिनिधी, मुंबई
विधानसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेचे विजय औटी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता 18 फेब्रुवारी 2019 रोजी होणाऱया विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही निवडणूक होईल असे सांगण्यात येते.
पारनेर मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदावर शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ व अपक्ष बच्चू कडू यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे औटी यांची बिनविरोध निवड झाली. आता विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माणिकराव ठाकरे यांची मुदत संपल्यापासून हे पद रिक्तच आहे. विधानसभा उपाध्यक्ष व विधान परिषदेच्या उपसभापतींची निवड हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी होईल असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक होऊन विजय औटी यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले, पण विधान परिषद उपसभापतीपदासाठी निवडणूक झाली नाही. विधान परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे 34 आणि शिवसेना- भाजपचेही संख्याबळ 34 आहे. अपक्ष 6 आमदारांसह 10 अन्य सदस्य आहेत.


























































