
सामना प्रतिनिधी । नागपूर
अमन मोखाडे व यश राठोडचे शतक आणि रोहित दत्तात्रयच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर विदर्भाने तामिळनाडूला 83 धावांनी पराभावाचा धक्का देत विनू मंकड चषक 19 वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय क्रिकेट विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. विदर्भ क्रिकेटच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आणि क्रिकेटप्रेमींना दिवाळीची भेटही दिली. विदर्भाने प्रथमच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली व बाजी मारली.
सिव्हिल लाइन्स येथील व्हीसीए स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत विदर्भाने तामिळनाडूला विजयासाठी 298 धावांचे लक्ष्य दिले होते. विदर्भाने 21 धावांवरच तामिळनाडूला पहिला धक्का देत वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर सलामीवीर पी. प्रवीणकुमारने (48), मधल्या फळेतील आर. सोनू यादवने (33) आणि शेवटी खेळणाऱ्या त्रिलोक नागने (34) धावा केल्या. मात्र, विदर्भाच्या भेदक मारा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे अन्य फलंदाज खेळपट्टीवर अधिक काळ टिकाव धरू शकले नाही. त्यामुळे तामिळनाडूचा डाव 45 षटकांत 214 धावांतच संपुष्टात आला आणि विदर्भाने विजेतेपदाचा झेंडा फडकाविला. फिरकीपटू रोहित दत्तात्रयने 37 धावांत पाच गडी टिपले व विदर्भाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. हर्ष दुबेने दोन गडी बाद केले.
कर्णधार यश कदमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, विदर्भाने दोन फलंदाज 54 धावांत गमाविले. तामिळनाडूच्या गोलंदाजांचा समाचार घेत अमन मोखाडेने अर्धशतक तर फटकेबाजी करीत यश राठोडने शतक पूर्ण करीत धावसंख्या 248 वर नेली. यश राठोडने 103 चेंडूत 13 चौकार झळकावित 104 धावा केल्या. यानंतर मोखाडेही शतक पूर्ण करण्यात मागे राहिला नाही. धावसंख्या 266 असताना त्रिलोक नागच्या चेंडूवर मोखाडेला प्रवीणकुमारने झेलबाद केले. मोखाडेने 124 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने 101 धावा केल्या. विदर्भाने निर्धारित 50 षटकांत सहा गडी गमावून 297 धावा केल्या. यश कदम (24) आणि हर्ष दुबे (13) धावांवर नाबाद राहिले. तामिळनाडूच्या त्रिलोक नागने 48 धावांत चार गडी बाद केले.
विदर्भ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अॅड. आनंद जैस्वाल यांच्याहस्ते विजेत्या विदर्भ संघाचा चषक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विदर्भ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, सचिव बी.एस. भट्टी उपस्थित होते. विजेत्या विदर्भाला बीसीसीआयकडून चार लाख आणि व्हीसीएकडून दहा लाख असे एकूण 14 लाखांचे रोख पुरस्कारही प्रदान करण्यात आले.




























































