Austria terror attack व्हिएन्ना दहशतवादी हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो सौजन्य- ट्विटर

ऑस्ट्रियाची (austria) राजधानी व्हिएन्नामध्ये (vienna) दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात सुरुवातीला  दोघांचा मृत्यू झाला होता आणि 15 जण जखमी झाले होते. यातील सात जण गंभीर जखमी झाले होते. जखमींपैकी काहींचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. ऑस्ट्रियाच्या गृहमंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे. हल्लेखोरांपैकी एकाला ठार मारण्यात तिथल्या सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे.

हा दहशतवादी हल्लाच-गृहमंत्री
ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहमा यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे. हा हल्ला विएन्नाच्या सेंट्रल स्वीडनप्लॉटज स्क्वेअरमध्ये झाला आहे. नेहमा यांनी हे दहशतवाद्यांचे कृत्य असल्याचे सांगतानाच काही लोकांचा मृत्यू झाला असून नेमका आकडा आत्ता सांगणे कठीण असल्याचं म्हटलंय.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पोलिसांनी इतर हल्लेखोरांचा शोध घ्यायला सुरुवात केली असून यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये असा इशारा दिला आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाही वापर करू नये असा इशारा देखील दिला आहे.

6 ठिकाणी झाला गोळीबार
हा हल्ला दोनपेक्षा अधिक बंदूकधाऱ्यांनी केला असल्याचे कळाले आहे. हल्लेखोरांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा होता अशीही माहिती मिळाली आहे. रात्री 8 च्या सुमारास या गोळीबाराला सुरुवात झाली आणि 6 वेगवेगळ्या ठिकाणी हा गोळीबार करण्यात आला अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या हल्ल्यात किमान 15 जण जखमी झाले असून त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. या जखमींपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला झाला हल्ला
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी ऑस्ट्रियामध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी लोकं त्यांना आवश्यक त्या गोष्टी खरेदी करण्यासाठी आणि लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी मुक्त वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले होते. व्हिएन्नाच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती आणि दहशतवाद्यांनी नेमका हाच भाग हल्ल्यासाठी निवडला होता. यावरून दहशतवादी व्यवस्थित कट रचून आले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

सरकारी इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी लष्कराकडे
ऑस्ट्रिया सरकारने व्हिएन्नामध्ये लष्कर पाठवलं आहे. तिथल्या सरकारी इमारतींच्या सुरक्षेसाठी लष्कराला पाठवण्यात आलं आहे. यामुळे पोलीस या इमारतींच्या सुरक्षेच्या जबाबदारीतून मुक्त होतील आणि त्यांचे लक्ष पूर्णपणे तपासावर केंद्रीत करू शकतील असं तिथल्या प्रशासनाने सांगितलं आहे.

ज्यूंचे धर्मस्थळ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ?
ज्या भागात हल्ला करण्यात आला आहे तो गजबजलेला भाग मानला जातो. इथे पब, बारची संख्या मोठी असल्याने या भागाला स्थानिक मंडळी बर्म्युडा ट्रँगल म्हणतात. याच भागामध्ये सिटेस्टेटेनगासी सिनेगॉगही आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला या सिनेगॉगला लक्ष्य करण्यासाठी केला होता का याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही. व्हिएन्नामधील ज्यू समुदायाचे अध्यक्ष ऑस्कर डॉईच्च यांनी सुरूवातीला सिनेगॉगपासून काही मीटर अंतरावर गोळीबार झाल्याचे सांगितले, मात्र तेव्हा सिनगॉग बंद होते असं ते म्हणालेय.