
औरंगजेबाच्या कबीरवरून सत्ताधाऱ्यांनी वाद पेटवला त्यातून नागपूरात दंगल झाली. नागपूर मध्ये सगळे समाज एकत्र नांदत असताना ठरवून वातावरण खराब करण्यात आले. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे दोन समाजातील दरी मिटवण्यासाठी सदभावना रॅली काढण्यात येणार, असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
उद्या नागपूरमध्ये संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षाभूमी इथे अभिवादन करून या रॅलीची सुरुवात होणार आहे. नागपूर मध्ये शांतता नांदावी, सर्व धर्म पंथातील लोकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण व्हावी, अशांत नागपूर शांत व्हावे म्हणून या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे असे वडेट्टीवार म्हणाले.
महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? संजय गांधी निराधार योजनेतील महिलाना लाडक्या बहिणी योजनेचे फक्त 500 रुपये देणार हे दुर्दैव आहे, ही महिलांची फसवणूक आहे. निवडणूक असताना मतांसाठी महिलाना सरसकट पैसे दिले आता मात्र तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा क्लृप्त्या लढविणे हे महायुती सरकारचे पाप आहे अशी टीका विधीमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली.
विदर्भात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे.मुंबई, मराठवाड्याला देखील फटका बसत आहे. वैनगंगा नदी कोरडी पडली आहे,काँग्रेसने आंदोलन केल्यावर फक्त एक टीएमसी पाणी सोडण्यात आले ते पुरेसे नाही आहे. गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट, यवतमाळ,वर्ध्यात ही काही भागात पाणी टंचाईच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकारने याबाबत आढावा घेऊन कारवाई करावी. तसेच गरज पडली तर टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

























































