
‘धर्म ही घाण आहे. धर्म बाजूला ठेवून लोकांनी समाजामध्ये सुसंवाद राखला पाहिजे. धर्मनिरपेक्षतेवर माझा विश्वास आहे पण बेगडी धर्मनिरपेक्षतेवर मात्र कणभरही विश्वास नाही. असे लोक कित्येक वर्षांपासून पद्धतशीरपणे समाजात पेरले गेले आहेत. अशा बेगडी धर्मनिरपेक्षतेवर मला संताप येतो.’ असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आज म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्याबाबत अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केल्याबद्दल गोखले यांच्यावर टीका होत आहे. त्या टीकेनंतरही आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. आपली बाजू मांडण्यासाठी विक्रम गोखले यांना आज मुंबईत पत्रकार परिषद बोलावली. ‘2014 पासून देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं वैयक्तिक मत असून त्यावर मी अजूनही ठाम आहे. मला माझे मत कुणावर लादायचे नाही, परंतु माझं मत मी मुळीच बदलणार नाही, असे गोखले म्हणाले.
माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा विक्रम गोखले यांनी केला. ‘कंगनाला मी व्यक्तिशः ओळखत नाही, तिच्यासोबत कधी काम केलं नाही. तिच्या विधानाला पाठिंबा देण्यामागे माझी काही कारणं असू शकतात. राजकीय विश्लेषक नसलो तरी मी राजकीय अभ्यासक आहे. 18 मे 2014 च्या ‘गार्डियन’च्या अंकामध्ये जे लिहिलंय तेच कंगना म्हणाली. ती काही चुकीचं म्हणाली नाही एवढंच मी म्हणालो होतो.‘ असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान केला नाही
मी कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकाचा अवमान केलेला नाही. परवाच्या भाषणात मी म्हणालो जे त्याचा मतितार्थ असा आहे की, ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल’ मग ज्यांनी देशासाठी प्राण दिले, फासावर लटकले, ब्रिटिश अधिकाऱयांना गोळ्या झाडल्या, त्यांची अवहेलना झाली, याबद्दल आपल्याला कुणालाही कसली शरम वाटत नाही.’ असेही गोखले म्हणाले.
देशात कम्युनिझम आणण्याची काहींची सुप्त इच्छा
देशाचे तुकडे तुकडे झाले पाहिजे, इथे कम्युनिझम आले पाहिजे अशी काहींची सुप्त इच्छा आहे. त्याला माझा विरोध आहे. शिवसेना-भाजपने एकत्र यावे ही माझी आजही इच्छा आहे. परंतु स्युडो सेक्युलॅरिझमला त्याची भीती वाटते. गेल्या 30-32 वर्षांत राजकीय पक्षांकडून मला ऑफर आल्या, मात्र मी कुणाकडेही गेलो नाही. स्युडो सेक्युलर लोकांना वाटतंय की मी त्यांच्या बाजूने बोलतोय. पण मी विद्यमान सरकारच्या विरोधातही जाहीरपणे बोलणारा माणूस आहे, असेही गोखले म्हणाले.






























































