
बांधकामाधीन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून मोहनकुमार महतो या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विलेपार्ले रेल्वे फाटकाजवळ एसआरएच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे मोहनकुमार हा काम करत होता. रविवारी दुपारी मोहनकुमार हा सहाव्या मजल्यावर काम करत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याला उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघाताची माहिती समजताच विलेपार्ले पोलीस घटनास्थळी गेले.
मोहनकुमार हा गेल्या वर्षभरापासून एका कंत्राटदाराकडे कामाला होता. त्याने इमारतीच्या कामाच्या वेळेस तेथे कोणत्याही जाळ्या, कामगाराला सेफ्टी बेल्ट आणि हेल्मेट अशी सुरक्षितेची साधने दिली नव्हती. मोहनकुमारच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंद केला आहे.


























































