
रिफायनरी प्रकल्पाविरोधातील वातावरण आता घराघरात पसरले आहे. रिफायनरी आंदोलनाबरोबरच गावागावात लग्नसराई सुरू असतानाही आंदोलनाचा कोणाला विसर पडलेला नाही. लग्नमंडपातही नव वधू–वर ‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’चा संदेश वऱहाडाला देत आहेत. सनईचा सूर आणि मंगलाष्टकाबरोबरच रिफायनरीविरोधाचा सूरही लग्नात घुमत आहे.
25 एप्रिल रोजी बारसू येथे माती परीक्षण सुरू होताच रिफायनरीविरोधातील आंदोलन पुन्हा पेटले. बारसू सोलगाव, शिवणे, धोपेश्वर आणि देवाचे गोठणे येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी होऊ लागले. बारसूच्या माळरानावर हजारो ग्रामस्थ एकवटले. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी फौजफाटा तैनात ठेवला होता. राज्यभरातून पोलिसांची कुमक आणली होती. तरीही त्याला न डगमगता ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. महामोर्चाच्या वेळी पोलिसांचा लाठीचार्जही ग्रामस्थांनी सहन केला. शेकडो ग्रामस्थांना अटक करण्यात आली. अनेक ग्रामस्थांना जिल्हाबंदी आणि राजापूर तालुकाबंदी करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलकांना धीर दिला. पोलीसांनी चारही बाजूनी नाकाबंदी केली असतानाही रानवाटेने ग्रामस्थ बारसू सडय़ावर पोहोचून आपले आंदोलन करत होते.
रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाचे निखारे घराघरात धगधगत आहेत. ‘रिफायनरी हटाव, कोकण बचाव’चा नारा घुमत आहे. सध्या लग्नसराईचा काळ असला तरीही पंचक्रोशीमध्ये रिफायनरीविरोधाचे वातावरण आहे. धोपेश्वर गावातील चि. गुरुप्रसाद रमेश मसुरकर आणि चि.सौ.कां. स्वाती यांच्या लग्नामध्ये वऱहाडाला ‘एकच जिद्द, रिफायनरी रद्द’चा संदेश वधू-वरांनी दिला. ‘एकच जिद्द, रिफायनरी रद्द’ची पाटी दाखवून ग्रामस्थांमध्ये आंदोलनाची जनजागृती करण्यात आली
.































































