
पाठीत खंजीर खुपसून शिवसेना पक्ष फोडणार्या सर्व गद्दारांचे येणार्या निवडणुकीत गोदावरी नदीत विसर्जन करण्यासाठी हिंगोलीची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा महत्वाची असणार असून, पक्षाच्या गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी ही सभा ऐतिहासिक करा, असे आवाहन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.
हिंगोली येथे दि.27 ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची रामलिला मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारी व आढावा बैठकीसाठी खासदार राऊत नांदेडला आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, विभागीय सचिव अशोक पटवर्धन, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख माधव पावडे, प्रमोद उर्फ बंडू खेडकर, बबनराव बारसे, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, दत्ता कोकाटे, जिल्हा संघटक नेताजी भोसले, विजय मुंडकर यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनायक राऊत यांनी मराठवाड्यातील हिंगोली येथे होणारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा ऐतिहासिक ठरणार आहे. त्याचे तुम्ही सर्व साक्षीदार व्हा, एकीकडे ही सभा जाहीर झाल्यानंतर मिंधे गटाने त्याच दिवशी परभणी येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम ठेवला आहे. मात्र आजपर्यंतच्या त्यांच्या कार्यक्रमाचा अनुभव घेता मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच लोक उठून जात आहेत. सरकारी पैशांच्या जोरावर असे कार्यक्रम घेवून जनतेची मने जिंकता येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. बीआरएस हा तेलंगणातील पक्ष महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात फिरत असून, भारतीय जनता पक्षाची ही बी टिम आहे. महाराष्ट्र एकसंघ रहावा हे हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ध्यास आहे, मात्र बीआरएसच्या माध्यमातून मराठवाड्याचा काही भाग तेलंगणाला तसेच चंद्रपूरचा भाग तेलंगणाला जोडून तसेच कोकणचा भाग गोव्याला जोडून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे त्यांचे मनसुबे शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नांदेड जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, होता आणि राहणार आहे. ज्या गद्दारांनी या जिल्ह्यात गद्दारी केली. सर्व बाबी, निधी मिळून सुध्दा पक्षाशी बेईमान झाले. अशा सर्व गद्दारांना या निवडणुकीत आपल्याला धडा शिकवून त्यांचे गोदावरी नदीत विसर्जन करायचे आहे, असा संकल्प आपण करुया, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र निवडणूका आपण जिंकणार नाही याचा अंदाज येत असल्याने हे सरकार निवडणूकाच घेत नाही. जाहीर झालेल्या निवडणूका रद्द केल्या जात आहेत, हे कालच्या सिनेटच्या निवडणूक प्रकरणावरुन दिसून आले. जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, येणार्या काळात इंडियाच्या माध्यमातून देशभरात जे वादळ निर्माण होणार आहे तसेच सबंध राज्यात जनतेची होणारी अवहेलना पाहता महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकविण्यासाठी आपल्याला सिध्द व्हायचे असून, हिंगोलीची सभा ही एैतिहासिक होण्यासाठी आपण सर्वांनी एकजूटीने कंबर कसु या, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचा इतिहास आणि त्याची पाळेमुळे जनमानसात रुजलेली असल्याने कुणीही किती पक्ष फोडण्याचा व दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी मराठवाड्यातील शिवसेना व शिवसैनिक जागेवरुन हलला नाही. संभाजीनगर नंतर आता हिंगोली येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे. ही सभा ऐतिहासिक व विक्रमी करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मिंधे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आजारी असताना पाठीत खंजीर खुपसून भाजपाच्या मदतीने सरकार पाडले, त्याची खुमखुमी जनतेत आहे. त्याचे परिणाम येणार्या काळात दिसतील. शिवसेना एक परिवार असून, राज्य नव्हे तर जागतिक पातळीवर ज्या पक्षाला मानाचे स्थान मिळाले आहे, गुलाबी पक्ष राज्यात वळवळ करत आहे हे भाजपचेच पिल्लू असून, जनतेने त्यापासून सावध राहिले पाहिजे. मराठवाड्यातील हिंगोलीची सभा एैतिहासिक करुन शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा बळकट करा, असे आवाहन त्यांनी केले.
संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी आपल्या भाषणात राक्षस प्रवृत्तीच्या विरोधात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे लढत आहेत. आपली ही लढाई आता बेईमानी विरुध्द इमानदारीची असणार आहे. गद्दाराविरुध्द खुद्दाराची लढाई आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत मराठवाड्यात होत असलेली हिंगोलीची सभा आपल्याला अभूतपूर्व व ऐतिहासिक करायची आहे. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.




























































