राज्यात 6 डिसेंबरनंतर दंगलीची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार राज्यांतील निवडणुका झाल्यानंतर देशात मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केले जात आहे. राज्यात 6 डिसेंबरनंतर अनेक ठिकाणी दंगलीची भीती आहे. काहीही घडू शकतं अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर फुलेवाडा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. आंबेडकर म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकते, अशी सूचना पोलिसांना देण्यात आली आहे. चार राज्यांतील निवडणूक झाल्यानंतर हे घडेल. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केले जात आहे. ओबीसी लढय़ाशी संबंध नाही असे लोक वक्तव्य करून राज्यात दंगल कशी होईल अशी परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत, असेही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. देशात पुन्हा वैदिक परंपरा सुरू कराव्यात, संविधान बदलणार अशा घोषणा केल्या जात आहेत, असे सांगून आंबेडकर म्हणाले, धार्मिक हस्तक्षेप होत आहे आणि आमच्या वैदिक धर्मावर आघात केला जात असल्याचा कांगावा ज्यांच्याकडून केला जात आहे तेच आता देशात हिंदूंचे राज्य असून देशाला हिंदू राष्ट्र करावं असं म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सरकार कोणाचं येईल ते सांगता येणार नाही. मात्र नरेंद्र मोदी पुढचे पंतप्रधान नसतील हे मी खात्रीने सांगू शकतो, असे आंबेडकर म्हणाले.

विश्व हिंदू परिषद किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या गोष्टीवर बोलत नाही; परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान बदलणार नाही असे वक्तव्य केले आहे, असे नमूद करून प्रकाश आंबेडकर म्हणाले, फडणवीस जे बोलत आहेत ते सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट करावे. फडणवीस यांना संघाच्या कार्यकारिणीत प्रांत प्रतिनिधी पदापर्यंतदेखील जाता आलेले नाही आणि ते संविधान बदलणार नाही असे सांगत आहेत. माझ्या मते रस्त्यावरील माणूस कितीही ओरडला तरी त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, असा टोला आंबेडकर यांनी फडणवीस यांना लगावला.

भुजबळांना मीच जेलबाहेर काढले…

मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर म्हणाले, आता परत मला इतिहास सांगायची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मानले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल. ओबीसीच्या लढय़ाचा जनक मी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.