छत्तीसगडमध्ये निवडणूक हिंसाचार; चकमकीत पाच कमांडो जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

सामना प्रतिनिधी, रायपूर

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया करीत दहशत माजवली. मतदानापासून रोखण्यासाठी दंतेवाडा जिह्यातील 12 गावांमधील लोकांना ओलीस ठेवले. दंतेवाडा येथे भुसुरुंग स्फोट घडवला. बिजापूर येथे चकमकीत ‘कोबरा’ बटालियनचे पाच कमांडो जखमी झाले आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

नक्षलग्रस्त आठ जिह्यांमधील 18 विधानसभा मतदारसंघांत आज मतदान झाले. नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाका नाहीतर जीवे मारू, अशी धमकी या मतदारसंघातील प्रत्येक गावात दिली होती. गावोगावी पोस्टर्स लावले होते. कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली तरी नक्षलवाद्यांच्या दहशतीचे सावट सुरुवातीपासून होते. दंतेवाडा जिह्यातील निलावाया, बुरगूम, पोटाली, नहाडी, काकडी, बर्रेम, जबेली, रेवाली, एटपाल, जियाकोडत, पुजारीपाल आणि मुलेर येथील लोकांना नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक जी.एन. बजेल यांनी दिली. या गावातील लोकांनी मतदान केले नाही. दरम्यान, दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. बिजापूर येथे पामीड पोलीस ठाण्याच्या परिसरात सीआरपीएफच्या ‘कोबरा’ बटालियनवर हल्ला केला. यावर जोरदार चकमक झडली. त्यात पाच कमांडो जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

ठळक वैशिष्टय़े
बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडणगाव आणि राजनंदगाव या आठ नक्षलग्रस्त जिह्यांत पहिल्या टप्प्यात 18 विधानसभा मतदारसंघांत मतदान झाले.
मतदानाची सरासरी 70 टक्के आहे.
राजनंदगाव मतदारसंघातून मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह रिंगणात आहेत. गेली 15 वर्षे मुख्यमंत्री असलेले रमणसिंह आणि भाजपसाठी ही निवडणूक या वेळी सोपी नाही.
भाजपविरुद्ध काँग्रेस अशी लढत बहुतांशी मतदारसंघांत आहे. मात्र या वेळी माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या पक्षाबरोबर बसपा आणि माकपची आघाडी आहे. त्यामुळे काही मतदारसंघांत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
दुसऱया टप्प्यातील 72 मतदारसंघांत 20 नोव्हेंबरला मतदान होईल. 11 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

1.25 लाख जवान, पोलिसांचा बंदोबस्त
नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया रोखण्यासाठी प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. केवळ 18 मतदासंघांत तब्बल 1.25 लाख सीआरपीएफ जवान आणि पोलीस तैनात केले होते.

summary- violence in chhatisgarh elections five commandos injured