गर्लफ्रेंडने दिला धोका…तो बनला ‘बेवफा चायवाला’…वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेमात फसवणूक झाल्याने अनेकजण खचतात. काहीजण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. तर काहीजण हे दुःख पचवून पुन्हा नव्या जीवनाची सुरुवात करतात. मात्र, प्रेमात फसवणूक झाल्याचा सल त्यांचा मनात राहतो. प्रेमात गर्लफ्रेंडने धोका दिल्याने मध्य प्रदेशातील एक तरूण असाच खचला होता. या दुःखावर मात करत त्याने पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. मात्र, प्रेमाची आठवण मनात कायम राहावी म्हणून त्याने आपल्या चहाटपरीचे नाव ‘बेवफा चायवाला’ असे ठेवले. या वेगळ्या नावामुळे हा चहावाला आणि त्याची टपरी चर्चेत आली आहे.

मध्य प्रदेशातील बेतूलमध्ये राष्ट्रीय महामार्ग 69 जवळील डोडरामोहर गावात ‘बेवफा चायवाला’ अशी पाटी दिसते. रस्त्याने जाणारे अनेकजण हे नाव पाहून थांबतात. येथील चहाचा आस्वाद घेतात आणि पुढे प्रवासाला सुरुवात करतात. हे नावच अनेकांना आकर्षित करत आहे. या टपरीला हे नाव दिले याच्यामागेही कारण आहे. काहीजण या नावामुळे या टपरीसोबत सेल्फीही काढत आहेत.

ही चहाटपरी मंगळ नावाच्या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. प्रेमात गर्लफ्रेंडने धोका दिल्याने मंगळ खचला होता. तो एकलकोंडा झाला होता. मित्रांनी आणि कुटुंबियांनी त्याला समजावले. या प्रसंगात धीर देत त्याला उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. हळूहळू तोही सावरला. काही महिने मजूरी करून त्याने पैसे कमवले. त्यानंतर या महामार्गाशेजारी चहाची टपरी सुरू केली. आपले प्रेम आणि गर्लफ्रेंडने दिलेला धोका नेहमी लक्षात राहावा म्हणून त्याने आपल्या टपरीला ‘बेवफा चायवाला’ असे नाव दिले. हे नावच अनेकांना येथे आकर्षित करते.

गावातच राहणाऱ्या एका तरुणीवर आपले प्रेम होते. तिचेही आपल्यावर प्रेम होते. आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका आम्ही घेतल्या होत्या. मात्र,अचानक त्या तरुणीने दुसऱ्याशी लग्न केले. तिने आपली फसवणूक केली. तिने असे का केले, याचे कारण समजले नाही. मात्र, माझे तिच्यावर खरे प्रेम होते. त्याची आठवण राहावी म्हणून टपरीला ‘बेवफा चायवाला’ नाव दिल्याचे मंगळने सांगितले.

सहा महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या टपरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावरून जाणारे अनेकजण येथे थांबतात. या नावाबाबत विचारणा करतात. त्यानंतर काहीजण सेल्फी काढतात. हे दुःख पचवून नवी सुरुवात केल्याबदद्ल अनेकांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या आपुलकीने धीर मिळत असल्याचे त्याने सांगितले. प्रेमात धोका मिळाल्याचे दुःख असले तरी या नावामुळे प्रेमाची कायम आठवण राहील, असेही त्याने सांगितले.

मंगळच्या टपरीवर येणारे अनेकजण त्याच्या मेहनतीचे कौतुक करतात. त्याच्या टपरीचे नाव आकर्षक असून तो चहादेखील चांगला बनवतो. त्याचा चहाचा आस्वाद घेण्यासाठी नेहमी येथे येत असल्याचे अनेकांनी सांगितले. मंगळच्या या टपरी सुरू करण्याने त्याचे मित्र आणि कुटंबिय समाधानी आहेत. आता त्याने दुःख विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.