महिलेने पाठदुखीच्या बहाण्याने ऑफिसमधून घेतली सुट्टी, सोशल मीडियावर टाकला डान्सचा व्हिडिओ! त्यानंतर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळेत असताना सुट्टी मिळावी, यासाठी आजारी पडल्याचे नाटक अनेकांनी केले असेल. शाळा, महाविद्यालयीन जीवन संपल्यावर नोकरी-व्यवसायाला सुरुवात होते. अशावेळी मोठं झाल्यानंतरसुद्धा काही जणांच्या बाबतीत ही सवय सुटतेच असे नाही. त्यामुळे मोठी माणसेसुद्धा काही वेळा खोटं बोलून कार्यालयातून सुट्टी घेतात. अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती घडत असतात. स्पेनमधील एका महिलेनेसुद्धा तब्येतीचे कारण सांगून कार्यालयातून सुट्टी घेतली, मात्र असे बोलण्याचा या महिलेला नाहक भुर्दंड सहन करावा लागला.

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, स्पेनमध्ये राहणारी पायडैड नावाची महिला 2006 सालापासून सेमार्क एसी ग्रुप नावाच्या कंपनीत काम करत होती. लुपा नावाची सुपरमार्केट कंपनीसुद्धा याच कंपनीशी निगडीत आहे. गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2021 रोजी तिने भरपगारी रजा घेतली. तिला तीव्र पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे, त्यामुळे ती सुट्टी घेऊ शकत नाही, असे सुट्टी घेण्याचे कारण तिने कंपनीला कळवले, पण हे केवळ रजा घेण्याचे निमित्त होते. रजा घेण्याचा बहाणा केल्यानंतर या महिलेने तिच्या टिकटॉक अकाउंटवर स्वत:चा ट्वर्किंग नृत्य करतानाचा व्हिडियो सोशल मिडियावर पोस्ट केला. ट्वर्किंग हा नृत्याचा एक प्रकार आहे. हा प्रकार खूप धाडसी मानला जातो. नर्तकाला पाठ आणि नितंबाचा वापर ट्वर्किंग नृत्य करताना जास्त प्रमाणात करावा लागतो. तिचा हा नृत्याचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर पायडैडच्या बॉसने तो पाहिला तेव्हा तो फारच संतापला.

सप्टेंबर 2021 मध्ये महिलेला कंपनीकडून अधिकृत इमेल पाठवण्यात आला. ज्यामध्ये तिला कामावरून काढून टाकण्यात येत असल्याचे लिहिले होते. मेलमध्ये असे लिहिले होते की, कंपनीच्या एरिया मॅनेजरने तिचा टिकटॉक व्हिडियो पाहिला. त्यामध्ये पायडैड नृत्य करताना दिसत आहे. सध्या तिने तब्येतीचे जे कारण सांगून सुट्टी घेतली आहे, त्यानुसार, तिने अशा प्रकारे नृत्य करणे अशक्य आहे. त्यामुळे स्पेनच्या सुपीरियर ट्रिब्युनल ऑफ जस्टिस म्हणजे न्यायालयाने एका सुपरमार्केटच्या कंपनीने घेतलेला पायडैडला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय ठाम ठेवला. यानंतर या महिलेने गेल्या वर्षीच तिच्या कंपनीविरुद्ध न्यायालायात कंपनीच्या विरोधात खटला दाखल केला, मात्र आतापर्यंत झालेल्या सर्व सुनावणीत पायडैड हरत होती. न्यायाधिशांनी सांगितले की, ज्या साडेआठ महिन्यांसाठी ती महिला रजेवर होती, त्या काळात तिने सोशल मिडियावर नृत्याचे व्हिडियो पोस्ट केले होते. कनिष्ठ न्यायालयात ही महिला हरल्यामुळे सध्या ती सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचा विचार करत तिने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा विचार करत आहे.