
>> विवेक दिगंबर वैद्य
‘नाही आनंदाला तोटा’अशी ग्वाही देत विजयादशमी अर्थात दसऱयाचा ‘मोठ्ठा’ सण प्रत्येकाच्या आयुष्याला सुखसौख्याचे नवरंगढंग बहाल करतो आणि निर्भर आनंदवृत्ती जागवत समृद्धी, सौख्याचा दरवळ मागे सोडून जातो. नवरात्रीच्या दिवसात चराचर सृष्टी कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात हरखून जाते, मोहरून जाते आणि पाठोपाठ तिला वेध लागतात ‘दीपोत्सवा’चे.
प्रत्येकाच्या आयुष्यात नवनव्या कल्पना, रंगरूप आणि भावभावना यांचे तेजोदीप उजळविणारा दीपोत्सव म्हणजेच दीपावलीचा सण. अंधारलेल्या जगाला ज्ञानाचा ‘दीप’ उजळून प्रकाशमयी, चैतन्यमयी करणाऱया तेजाच्या कल्लोळाचे स्वागत म्हणजेच दीपावलीचा सण. लोकजीवनाच्या पारंपरिक रीतीरिवाजांना प्रगट करणारा लोकोत्सव म्हणजेच दीपावलीचा सण. चार भिंतीआड राहणाऱयांना उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आकाशाचे अंगण बहाल करणारा हा दीपावलीचा सण. नैराश्याची काजळी पुसून तिथे सृजनाची प्रकाशरेघ रेखाटणाऱया सणाचे सूतोवाच करणारा हा दीपावलीचा सण. चाचपडणाऱया चिमुकल्या बालमनाला, थरथरणाऱया वयोवृद्ध पावलांना, घामेजलेल्या कष्टकरी दणकट हातांना व मातृत्वाचे लोभस रूप ल्यायलेल्या ‘माऊली’तत्त्वाला अस्तित्वाचे अनोखे परिमाण लाभून देणारा दीपावलीचा सण म्हणजेच, दिवाळी. तुमच्या-आमच्या परिचयाची ही दिवाळी आपले ‘स्थान’ माहात्म्य कसे राखून आहे ते जाणून घेऊया.
दिवाळी या मांगल्यमयी सणाची असंख्य रूपे आहेत.
शहरी, नागर संस्कृतीतील उच्चभ्रूंच्या मोजूनमापून वागण्यात संकोचलेली दिवाळी आणि ग्राम्य संस्कृतीचा बिनधास्त लहेजा धारण करून अवखळ, बेभान, तरीही निरागस दिवाळी या एकाच नाण्याच्या दोन बाजू. अगदी पाठीला पाठ लावून फिरणाऱया, वेगळेपणाची हौस मिरवणाऱया तरी आपल्या परंपरेतील वेगळेपण जपणाऱया आहेत. काहीजणांना शहरातील दिवाळी रुचते, भावते. तर काहीजण तिच्या शहरी, सुखासीन व्यक्तित्वाला भुलतात आणि तिच्याकडे आकर्षित होतात. मात्र गतकाळाच्या झुल्यावर बसलेल्या अनेकांना दिवाळी म्हटली की आठवतात ते गावाकडचे स्निग्ध, शांत व जगण्याला समृद्ध करणारे दिवस.
पुणे-मुंबई, नाशिक-नागपूर, कोल्हापूर-सोलापूर आदी शहरी भागात साजरी होणारी दिवाळी कमी-अधिक प्रमाणात एकाच पद्धतीची असते. मात्र आजही गावाकडे, शहरीकरणाचा ‘वारा’ न पोहोचलेल्या भागामध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने संस्कृती, नेमनियम तितक्याच कसोशीने पाळले जातात. परंपरागत चालीरीती आणि रीतीरिवाजाचे पालन काटेकोरपणे केले जाते. घराच्या स्वच्छतेपासून ते फराळाचे गोडधोड पदार्थ करण्यापर्यंतची जबाबदारी मुख्यत्वे करून स्त्रीवर्गाकडे असते. पुरुषवर्गाकडे ‘वित्त विभाग’ असतो. गडी-माणसे बोलावून अंगण शाकारून घेणे, घराला रंगरंगोटी करणे, शेतीमालाची कामे मुदतीत करवून घेणे आणि मिळकतीचा हिस्सा योग्य मार्गाने खर्च करीत बायको-मुलांसमावेत दिवाळीचा आनंद लुटणे ही कामे आपसूकच पुरुषवर्गाकडे येतात.
दिवाळी निमित्ताने केली जाणारी खरेदी ही लगीनसराईच्या खरेदीइतकीच महत्त्वाची असते. स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी कपडेलत्ते, दागदागिने, वस्तू व मिठाया खरेदी केल्या जातात. दिवाळी हा सण स्वखर्चासाठी आणि स्वखर्चाने इतरांना भेटवस्तू देण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. नातेवाईक, मित्रमंडळी, स्नेही, आप्तेष्ट असे प्रत्येकजण एकमेकांना या सणाच्या केवळ शुभेच्छा देत नाही तर सढळ हाताने भेटवस्तू, गोडाधोडाचे पदार्थ देऊन शुभवर्तमानाचा संकेत पाळतात.
परस्परांमधील आनंद द्विगुणित करणारा द घरातील कर्त्या माणसांपासून नोकरा-चाकरांपर्यंत सर्वांचा सन्मान करणारा हा सण आहे. तसा माणसातील माणूसपण जागविणारा आणि आपल्यातील ‘कलासक्त’ वृत्ती जागृत करणारा सणदेखील आहे. गेरूच्या मातीने आखलेल्या लालेलाल चौकोनावर पांढरे ठिपके पसरून रांगोळीच्या रंगांची उधळण केली जाते. निरनिराळ्या आकारातून उमटणारी रंगांची नक्षीदार चौकट कलाकारांमधील सुप्त कल्पनाशक्तीचे प्रात्यक्षिक सादर करते. कलावंतांच्या बोटांमधून सरसर फिरणाऱया लोखंडी कात्रीने पाहता पाहता रंगीत कागदांच्या भेंडोळ्यांतून नक्षीदार आकार तयार होऊन आकाशकंदिलाच्या रूपाने घराच्या दर्शनी भागाची श्रीमंती वाढवतात.
दिव्याची मनमोहक आरास दीपावली हा ‘दीपोत्सव’ असल्याची जाणीव करून देते. काही ठिकाणी रांगोळ्यांच्या चौकटीवर काचेच्या बिलोऱया रेखून ‘अल्पना’ रेखाटतात. यालाच ‘चौक मांडणे’ असेही म्हटले जाते. रंगीबेरंगी रांगोळ्यांतील काचेच्या तुकडय़ांतून पणत्यांचा परावर्तित होणारा प्रकाश नेत्रसुखद असतो. या सादरीकरणामध्ये लहानग्या लेकीबाळी आणि कुमारिकांचा सहभाग प्रामुख्याने दिसून येतो.
लक्ष्मीपूजन अर्थात चोपडा पूजन हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस. शुभमुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करून खोबरे, धने, गूळ यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. काही ठिकाणी लक्ष्मीपूजन करून तिच्या समोर अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. त्या संपूर्ण रात्री त्यावर जमा होणारी काजळी दुसऱया दिवशी स्नान झाल्यावर लहानथोर मंडळींच्या डोळ्यात ‘काजळा’प्रमाणे घातली जाते. काही ठिकाणी, पाडव्याच्या दिवशी गृहिणी, गृहलक्ष्मी भल्या पहाटे उठून जुने सूप हाती घेऊन त्यात आदल्या दिवशीचा कचरा भरून तो कचरा बाहेर परसदारी फेकून देते. नंतर त्या सुपावर लाटणे आपटून ‘लक्ष्मी लक्ष्मी ये ये, दारिद्रय़ा जा जा’ असे म्हणण्यात येत. त्यानंतर महालक्ष्मीची साग्रसंगीत पूजा करून पुढे परिस्थितीनुसार ‘अन्नकोट’ केला जातो आणि सर्वांना साग्रसंगीत भोजनदान दिले जाते.
दिवाळी हा सण प्राचीन काळापासून प्रचलित आहे. चारपाच दिवस चालणाऱया या सणाच्या निमित्ताने तेजाची, जलाची, धनाची, भूमीची व पशूंचीही पूजा केली जाते. संस्कृतीची नानाविध वैशिष्टय़े या सणाच्या निमित्ताने प्रकट होतात. आर्य उत्तर ध्रुव प्रदेशात असताना सहा महिन्यांची दीर्घ रात्र समाप्त झाल्यावर सहा महिन्यांचा दिवस सुरू होत असे. त्यांच्या या ऋतूबदलाचे सूतोवाच करणाऱया दिवाळीचे आर्यांना विशेष अप्रूप वाटत असे. तर काहींच्या मते विजयी होऊन अयोध्येस परतलेल्या श्रीरामचंद्राच्या आगमनाप्रीत्यर्थ हा सण साजरा केला गेला तर काहींच्या मते विक्रम संवत्सराचा प्रारंभिक दिवस म्हणून हा सण साजरा करण्यात आला. काहींच्या मते हा सण अशोक सम्राटाच्या दिग्विजयाचा प्रारंभ म्हणून साजरा केला जातो. पौराणिक संदर्भानुसार वामनाने बळीला पाताळात ढकलले ही घटना आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावास्या या काळात घडली. त्यावेळी बळीने यमयातना टळाव्या आणि सर्वसामान्यांचे जीवन सुखी व्हावे याकरिता वामनाकडे प्रार्थना केली. म्हणून प्रतिपदेला ‘बलिप्रतिपदा’ असे संबोधून दीपदान केले जाते आणि बलीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
गावाकडे मात्र या सणाला ऋतूबदलाचा निदर्शक म्हणूनही पाहिले जाते. घरी दूध-दुभत्याची रेलचेल असते. कोवळा चारा खाऊन पशुधन तृप्त झालेले असते. या कृषीवैभवाला ‘खूश’ करण्यासाठी ‘गोवत्स द्वादशी’ साजरी केली जाते यालाच ‘वसूबारस’असेही म्हणतात. या दिवशी गाईगुरांना सजवितात-धजवितात. त्यांना न्हाऊमाखू घालून, गोडधोड खाऊ घालतात. ‘ईडा पीडा टळो – बळीचे राज्य येवो’ म्हणत या पशुधनाला आवाहन केले जाते. काही ग्रामीण संस्कृतीमध्ये पांडवपूजा केली जाते तर याच संदर्भाने काही गावांमध्ये गोवर्धनाची पूजाही करण्यात येते. दिवाळी हा सण केवळ आबालवृद्धांसाठीच नाही तर गाईगुरांसाठीही महत्त्वाचा आहे.
आजकाल, कालानुरूप या सणाच्या आनंदाला पर्यटनाचे वेगळे परिमाण लाभलेले आहे. गेली काही वर्षे दिवाळीच्या सुट्टय़ांना जोडून बाहेरगावी पर्यटनासाठी जाण्याची संकल्पना रूढ आणि हळूहळू दृढही झाल्याचे पाहावयास मिळते. तर अनेक ठिकाणी, दिवाळीच्या मंगल वातावरणात आपल्या आराध्यदैवताचे दर्शन घेण्याची परंपराही रुजू होऊ पाहात आहे. या कारणाने, महाराष्ट्रातील शिर्डी, शेगाव, पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर, अष्टविनायक, अक्कलकोट, गोंदवले तसेच हिंदुस्थानातील चारधाम, काशी-वाराणसी, अयोध्यानगरी, दक्षिण हिंदुस्थानातील मंदिरे भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहात असल्याचे चित्र नजरेस पडते. दिवाळीच्या निमित्ताने या मंदिरांना दिव्यांची व फुलांची रोषणाई करून मंदिरांचे सौंदर्य अधिक देखणे केले जाते. या पवित्र स्थानांचे ‘माहात्म्य’ जाणून घेत सणासुदीचा आनंद द्विगुणित करणारी मंडळी पाहिली की मराठी माणसांमधील आणि हिंदुस्थानींमधील देवभक्ती आपल्या अध्यात्म मार्गाला अधिक प्रशस्त करते.
पहाटेचा दवभरला आसमंत, त्यावर चढलेली थंडीची दुलई, खरखरीत उटण्याचे ‘अभ्यंग’, अंधाराला छेद देणाऱया पणत्यांचा अलौकिक तेजस्वी प्रकाश, मांगल्याचा दरवळ लाभलेली रांगोळीची पखरण अशी सुचिन्हे लेवून झेंडूच्या फुलमाळांनी प्रवेशद्वार सजते. क्षणाक्षणाला धडाडणारे फटाके दिवाळीच्या मंगलमय पर्वाच्या स्वागताची सुवार्ता देतात. मंद हेलकावणारा कंदील झिरमिळ्या सरसावून या महत्त्वाच्या सणाचे स्वागत करतो. घराघरातून पणतीचे तेल, उटण्याचा सुवास आणि फराळाच्या पदार्थांची चव एकजीव होऊन एक नवाच सुगंध दरवळत राहतो आणि दिव्यांच्या या उत्सवाचे आनंददायी वातावरण निर्माण करतो.
दीपोत्सवाचे औचित्य साधून प्रत्येकाला सुखसौख्य लाभो ही सदिच्छा. सौख्यसुखाची उधळण करणाऱया दिवाळीचे मंगलमय तेज आपणा सर्वांच्या आयुष्यास लाभो आणि जगण्याचा प्रत्येक क्षण आनंदोत्साहाने उजळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ‘शुभ दीपावली’!





























































