
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक, हिंदुत्ववादी विचारवंत, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य, भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात यांचे सोमवारी दुपारी कोरोनामुळे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
वा. ना. उत्पात हे हिंदुत्वावादी विचारसरणीचे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला. तसेच सावरकर साहित्याचा प्रसार केला. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व अध्यात्म क्षेत्रातील प्रमुख नाव असून, त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदही भूषविले होते. प्रसिद्ध शैक्षणिक संस्था पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष होते.
भागवताचार्य उत्पात यांनी आयुष्यभर अध्यापनाचे कार्य केले. ते कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात 25 वर्षे श्रीमद् भागवत व रुक्मिणी स्वयंवर कथा सांगितली. ते रुक्मिणी मातेचे उपासक होते. आजवर त्यांनी 18 पुस्तके लिहिली आहेत. उत्पात यांनी अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आपला दबदबा राखला होता.
वा. ना. उत्पात हे पंढरपूर अर्बन बँकेचे प्रदीर्घकाळ संचालक होते. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली व भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून भव्य वास्तू व क्रांती मंदिराची उभारणी केली.




























































