
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालांनंतर तब्बल २० दिवसांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फेसबुक लाईव्ह करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ममता बॅनर्जी पहिल्यांदाच जनतेसमोर आल्या. त्यांनी भाजपवर मतांची चोरी केल्याचा मोठा आरोप केला. आम्हाला २२० ते २३० जागा मिळायला हव्या होत्या, पण निकाल बदलण्यात आले, असा दावा त्यांनी केला. टीव्ही९ भारतवर्षने या संदर्भात वृत्त दिले आहे.
भाजपने आमची मते लुटली. आमच्या दोन ते अडीच हजार कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले. गरीब फेरीवाल्यांचा रोजगार हिरावून घेतला आणि आमचे पक्ष कार्यालयही फोडले, असा संताप ममता यांनी व्यक्त केला. सर्वांसाठी समान नियम असायला हवेत, तुम्ही कोणाचाही हक्क हिरावून घेऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच पहलगाम घटनेतील पीडितांना मदत करणारे सुदीप पोले यांनाही अटक केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात सध्या प्रशासनाची दहशत सुरू असून निवडणूक आयोगावरही नियंत्रण मिळवले जात आहे. ही निवडणूक आहे की थट्टा? असा प्रश्न त्यांनी विचारला. भाजपच्या लोकांनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या वेशात मतमोजणी केंद्रात घुसून मते चोरली आणि राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा डेटा हॅक केला, असा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केला.
सत्तेत बसलेल्यांचे नाव घ्यायला मला आवडत नाही. त्यांनी स्वतः मतमोजणी केंद्रात बसून मते चोरली आहेत. तसे नसते तर आम्हाला नक्कीच २०० ते २२० जागा मिळाल्या असत्या. भाजप खरोखरच जिंकला असेल तर लोकांमध्ये आनंद का दिसत नाही? आम्ही जिंकलो तेव्हा गाणी गाऊन आनंद साजरा केला होता. भाजपने मते चोरली आहेत, त्यांचे जिंकणे शक्यच नव्हते, असे ममता म्हणाल्या. याशिवाय एका कलाकाराने बनवलेला स्टेडियममधील फुटबॉलचा पुतळा हटवल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्यावर राग होता म्हणून तो पुतळा काढला का, असा सवाल त्यांनी विचारला.





























































