पंढरपूर विधानसभा, बेळगाव लोकसभेसाठी आज मतदान; 19 उमेदवार रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक आणि बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. पंढरपूर विधानसभेसाठी 19 उमेदवार रिंगणात असून,  राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान आवताडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. बेळगाव लोकसभेसाठी दहा उमेदवार रिंगणात असले तरी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके, भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी आणि काँग्रेसचे सतीश जरकीहोळी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. प्रस्थापितांच्या विरोधात मराठी भाषिक शुभम शेळके यांच्यासाठी एकवटले असून, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या रॅली आणि जाहीर सभेने बेळगावात झंझावात निर्माण केला आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 524 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. निवडणूक निर्भय, निःपक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान अधिकारी, कर्मचारी व मतदान साहित्य 94 एसटी बसेस व 3 जीपद्वारे पोहोच करण्यात आले आहे.

बेळगावात 2566 मतदान केंद्रे

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, शनिवार दि.17 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 2 हजार 566 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. 18 लाख 13 हजार 567 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पोलीस खात्यानेही याची सर्व तयारी केली आहे. सुमारे 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आयुक्तांपासून उपनिरीक्षकांपर्यंत सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड्स व अन्य विविध तुकडय़ा बंदोबस्तावर राहणार आहेत. शुक्रवारी निवडणूक कर्मचाऱयांना मतदानयंत्र व अन्य निवडणूक साहित्य जिल्हाधिकारी के. हरिशकुमार यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. तसेच मुक्त, निर्भय आणि कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वातावरणात सुरळीतपणे निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत.