
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्लीसह सात राज्यांत मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, मध्य प्रदेशातील 8, बिहारमधील 8, पश्चिम बंगालमधील 8, हरयाणातील सर्व 10 आणि दिल्लीतील 7 जागांवर मतदान होणार आहे. भाजपसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. 2014 च्या निवडणुकीत या 59 जागांपैकी 44 जागा भाजपकडे असून त्या कायम राखण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यापुढे आहे, तर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशमध्ये बसपा नेत्या मायावती यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
उत्तर प्रदेशमधील 14 जागांवर मतदान होत असून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची परीक्षा घेणारा हा टप्पा आहे. भाजप, काँग्रेस आणि सपा-बसपा आघाडी अशी तिरंगी लढत येथे होत आहे. गेल्या वेळी या 14 पैकी 13 जागा भाजपने जिंकल्या होत्या. आझमगडच्या एकमेव जागेवर मुलायमसिंग यादव यांनी विजय मिळवला होता. यावेळी येथे सपाकडून अखिलेश यादव लढत देत आहेत. सुलतानपूर येथून केंद्रीय मंत्री मनेका गांधी, अलाहाबाद येथून रिटा बहुगुणा नशीब अजमावत आहेत.
हरयाणात भाजपची सत्ता असून गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने येथे 10 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या. राज्यात या वर्षीच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने सर्वच पक्षांनी लोकसभेचे मैदान मारण्यासाठी येथे जोर लावला आहे. या ठिकाणी मतदान होत असलेल्या आठही जागा तृणमूल काँग्रेसकडे असून त्या कायम राखण्याचे आव्हान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर आहे.
भोपाळमध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची लढत भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांच्याशी होणार आहे. दिल्लीतील सातही जागा सध्या भाजपकडे असून आम आदमी पार्टी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत येथे होत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.



























































