
पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात तंगडतोड ; लाखो रहिवाशांचा द्राविडी प्राणायाम सुरूच
अंधेरी के पूर्व प्रभागाचे उपनिबंधक सहकारी संस्थेचे कार्यालय वडाळा ट्रक टर्मिनसमधून पुन्हा अंधेरीच्या पश्चिम भागात स्थलांतरित करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, पण अजूनही राज्याच्या सहकार विभागाला स्थलांतराचा मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे पश्चिम उपनगरवासीयांना सहकार संस्थेशी संबंधित कामासाठी 17-18 किमी दूर जाण्याचा द्रविडी प्राणायम करावा लागत आहे. परिणामी लाखो पश्चिम उपनगरवासीयांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंधेरीच्या पश्चिमेला द्रूतगती महामार्गाच्या पुलाखाली पूर्वी उपनिबंधक कार्यालय होते, पण सहकार खात्याने हे कार्यालय वडाळा ट्रक टर्मिनस येथे स्थलांतरित केले आहे. वास्तविक अंधेरी, सांताक्रुझ, विलेपार्ले, जोगेश्वरी पूर्वेला राहणाऱया रहिवाशांना इमारत, घर खरेदी-विक्री, गृहनिर्माण सोसायटीशी संबंधित कामे व तक्रारी तसेच मालमत्ताविषयक कामासाठी अंधेरीचे कार्यालय अतिशय सोयीचे होते. एवढेच नाही तर कुर्ला ते मुलुंड भागातील रहिवाशांनाही अंधेरीचे कार्यालय येण्या-जाण्यासाठी सोयीचे होते. पण आता हे कार्यालय वडाळा ट्रक टर्मिनस भागात स्थलांतरित केल्याने रहिवाशांचे खास करून ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. कारण बऱयाचशा गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. निवृत्तीनंतर अनेक जण सोसायटय़ांची कामे बघतात. त्यांना उपनगरातून थेट वडाळा ट्रक टर्मिनससारख्या भागात जाणे त्रासाचे आहे.
विलेपार्ले येथील पार्ले पंचम संस्थेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर म्हणाले की, सहकारी संस्थेच्या कामासाठी विलेपार्ले येथून वडाळा रेल्वे स्थानक गाठावे लागते. मग वडाळा स्टेशन येथून ट्रक टर्मिनसमधील सहकार उपनिबंधकाच्या कार्यालयात रिक्षाने जाण्या-येण्यासाठी किमान दोनशे रुपये खर्च येतो. यामध्ये वेळ, श्रम व पैसाही वाया जातो. मालमत्तेशी संबंधित तक्रारी असल्यास तक्रारदाराला प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राहावे लागते. कोणत्याही कामासाठी वडाळय़ाला किमान तीन चार फेऱया माराव्या लागतात असे श्रीधर खानोलकर सांगतात.
हे कार्यालय अंधेरीत स्थलांतरित करण्यासाठी पश्चिम उपनगरवासीयांनी राज्य सरकारला पत्र पाठवले होते. त्यानंतर मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपनिबंधक सहकारी संस्थेचे कार्यालय पुन्हा अंधेरीत स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. वास्तविक अंधेरी के पूर्व विभागात पुरेशी जागा आहे, तरीही अंधेरीत कार्यालयासाठी आम्ही जागाही दाखवली आहे, पण तरीही सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे रोहन सावंत सांगतात.
स्थलांतरामुळे कोणती कामे अडली?
सहकार संस्थेची हिशेब तपासणी, हिशेबातील दोष सुधारणा, संस्थेची रचना, कामकाज, आर्थिक स्थिती, मालमत्तेच्या तक्रारी.




























































