नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। वाढवण

वाढवण येथे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण प्रल्हाद पाटील असे या भामट्याचे नाव असून त्याच्याविऱोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

कामाजी नारायण जमजाळ हा पिरसावरगाव तालुका मुखेड येथील तरुण नोकरीच्या शोधात होता. त्याचवेळी त्याची ओळख लक्ष्मण प्रल्हाद पाटील याबरोबर झाली. लक्ष्मणने कामाजीला रेल्वेत हेल्पर नोकरी लावून देतो. पण त्यासाठी पैसे मोजावे लागतील असे आमिष दाखवले. त्याने कामाजीकडून साडेसहा लाख रुपये उकळले. त्याला नोकरीवर रुजू राहण्याचे खोटे बनावट आदेशही दिले . पण तो आदेश खोटा असल्याचा कामाजीला कळाले. त्यानंतर त्याने लक्ष्मणविरोधात तक्रार दाखल केली.

पोलीसांनी केलेल्या चौकशीत आरोपी लक्ष्मण याने कामाजीबरोबरच दहा ते बारा बेरोजगार युवकांनाही नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याचे समोर आले.