
सामना प्रतिनिधी । मुंबई
वाळकेश्वरच्या राजभवनची लांबलचक भिंत लवकरच पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. पालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या पुढाकाराने या भिंतीवर वारली चित्रकलेतून अख्ख्या मुंबईचे दर्शन घडणार आहे. राजभवनच्या गेट नं. 1 पासून गेट नं. 2 पर्यंतची एक हजार फूट लांब भिंत अशी कलात्मक पद्धतीने सजवण्यात येणार आहे.
राज्यपालांचे वास्तव्य असलेली वाळकेश्वरमधील राजभवन ही वास्तू आधीच पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. आतून अतिशय देखणी आणि विस्तीर्ण असलेली ही वास्तू आता बाहेरूनही सजणार आहे. आर्टदेश फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने ही भिंत चितारली जाणार आहे. आदिवासी पाडय़ात भिंती गेरूने सारवून त्यावर वारली पद्धतीने ग्रामीण जीवनशैली चितारली जाते. तशाच पद्धतीने लाल रंगाच्या भिंतीवर वारली पद्धतीने मुंबई दर्शन घडणार आहे. भिंत चितारण्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून पर्यटकांना, मुंबईकरांना याचा आस्वाद घेता येणार आहे, अशी प्रतिक्रिया डी विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.
- ही भिंत 6 फूट उंच असून 1092 फूट लांब आहे. एकूण 6000 चौरस फूट आकारात ही चित्रं काढली जाणार आहेत. संस्थेने याकरिता 69 गट बनवले आहेत. त्यांना एकूण 60 थीम देण्यात आल्या आहेत.
- ग्रामीण भागातील जीवन, त्यांची शेती, पिकं, पिकांची कापणी, कापलेल्या पिकांची मोळी बांधून मुंबईकडे निघालेले लोक आणि मग मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, काळा घोडा, ससून डॉक, बाणगंगा अशी मुंबईची सफर या चित्रातून घडवली जाणार आहे.
























































