
हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर इस्रायलने हमासच्या खात्मा करेपर्यंत हे युद्ध सुरू राहील, असा निर्धार इस्रायलने व्यक्त केला आहे. त्यामुळे हे युद्द दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. आता इस्रायलने युद्धविरामासाठी हमासला पर्याय दिला आहे. या युद्धामुळे जागतिक वातावरण तापले आहे. काही देश इस्रायलच्या बाजूने आहे. तर काही देश पॅलेस्टाइनच्या बाजूने आहेत. त्यामुळे इस्रायलच्या प्रस्तावाला काय प्रतिक्रिया देण्यात येणार, याबाबत जगभरात चर्चा होत आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनांमध्ये युद्ध सुरू आहे. एकमेकांवर क्षेपणास्रे डागून हवाई हल्ले केले जात आहेत. यामुळे आतापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांतील हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. हे युद्ध केव्हा थांबेल याची काहीही शाश्वती नाही. आता इस्रायलने युद्धविरामाचा एक पर्याय सुचवला आहे. तो पर्याय हमासला मान्य असेल तरच हे युद्ध थांबू शकते, असे इस्रायल लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉनरिक्स म्हणाले आहेत.
इस्रायलने हवाई हल्ल्यांना सुरुवात केली असून लवकरच जमिनीवरील कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी गाझाच्या सीमेवर इस्रायल लष्कर तैनात करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायलकडून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लेफ्टनंट कर्नल पीटर लर्नर यांनी बीबीसी न्युजआरला सांगितले की, जमिनीवरील कारवाई सुरू करण्याआधी हमासच्या तावडीत असलेल्या इस्रायली ओलिसांना सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जमिनीवरील हल्ला सर्वांत चांगल्या ऑपरेशनल वेळी केला जाईल, असेही ते म्हणाले.
लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉनरिक्स यांनी ऑस्ट्रेलिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, हमासने पूर्णपणे आत्मसमर्पण करून ओलिसांना सोडल्यास युद्धविराम केला जाईल. जेव्हा हमास नष्ट होऊन भविष्यात कधीही इस्रायली नागरिकांना नुकसान पोहोचवण्याची हिंमत करणार नाहीत, तेव्हाच हे युद्ध संपेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



























































