वारजेत कपडे विक्री व्यावसायिकाच्या घरावर दरोडा, 14 लाखांचा ऐवज चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

कामानिमित्त घर बंद करून बाहेरगावी गेलेल्या कापड विक्री व्यावसायिकाच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी 13 लाख 70 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना काल पहाटेच्या सुमारास वारजेतील शांतीसंकुल इमारतीत घडली. याप्रकरणी जेठाराम जोशी (वय 48) यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

जेठाराम यांचे कपडे विक्रीचे दुकान आहे. त्यांनी मुला-मुलीच्या लग्नासाठी घरात रोकड आणि दागदागिने असा मिळून 13 लाख 70 हजारांची ऐवज ठेवला होता. त्यानंतर ते कामानिमित्त कुटूंबीयासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 9 लाखांची रोकड आणि दागिने असा ऐवज चोरून नेला आहे. गावाहून परत आल्यानंतर जेठाराम यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नरेश मुंढे यांनी दिली आहे.

रविवार पेठेत सराफाला कामगाराचा 25 लाखांचा गंडा

सोन्याच्या लगडीचे दागिने बनवून देण्याच्या आमिषाने सराफी कारखान्यातील कामगाराने रविवार पेठेतील सराफाला 25 लाख 55 हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सराफाने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदाराचे रविवार पेठेत दागिने बनविण्याचा कारखाना आहे. त्यांनी कामगाराकडे 25 लाख 55 हजारांच्या तीन सोन्याच्या लगडी कामगाराकडे दिल्या होत्या. सोन्याच्या लगडी घेउन कामगाराने पळ काढला आहे. याप्रकरणी एपीआय अभिजीत पाटील तपास करीत आहेत.