ऊबदार पोशाख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पूजा पोवार

नुकताच डिसेंबर महिना सुरू झालाय आणि पहाटेच्या वेळी थंडीची हलकीशी चाहूलही लागू लागलीय. या दिवसांत खाणं, व्यायाम याबरोबरच मूड छान ठेवण्यासाठी स्टायलिश आणि ऊबदार कपडे वापरणे म्हणजे हव्याहव्याशा वाटणाऱ्या गुलाबी थंडीची खरी मजा घेणे. आजकाल डोक्यापासून पायापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे ऊब देणारे लोकरीचे कपडे बाजारात मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे काही वेळा थंडी कमीही होते अशा वेळीही परिधान करण्याचे फॅशनेबल पोषाख बाजारात उपलब्ध आहेत. म्हणजे फॅशनसाठीही हिवाळा पोषकच.

हिवाळ्यासाठी लोकरीचे फॅशनेबल कपडे

आभा किंवा आभ्या : हे कपडे कश्मिरी गाऊनप्रमाणे असतात. ज्यावेळी खूप थंडी असते. त्यावेळी संपूर्ण शरीर झाकले जावे यासाठी हे कश्मिरी आभा गाऊन घातले जातात. यामध्ये सर्व शरीराचं रक्षण होतं. हा पॅटर्न आपल्याकडेही आता फॅशन ट्रेंडमध्ये आहे. लांब कफ्तानसारखं लोकरीने तयार केलेला हा गाऊन असतो.

थंडीचा स्टायलिश लूक

सध्या पश्मिना स्कार्फ आणि स्टोल्स, लोकरीच्या विणलेल्या विंटर कॅप्स यांचा ट्रेंड आहे. हे ऊबदार कपडे थंडीचा स्टायलिश लूक देतात. याशिवाय टर्टल नेक स्वेटर्स- टॉप, ड्रेसेस, कश्मिरी स्वेटर हे नेहमीच वापरता येतात. याची फॅशन केव्हाही जुनी होत नाही. मुंबईच्या हवामानासाठी ‘कार्डिगन’ हे मोठय़ा आणि लहान आकारातही मिळतात.  यामध्ये क्रॉप कार्डिगनही मिळतात. त्यामुळे ते कमी थंडीच्या दिवसांतही घालता येतात. यासोबत स्टायलिश टोप्या, लाईट रंगाचे पायमोजे, हातमोजे आवडीप्रमाणे वापरू शकता.

ब्लेझर्स, स्टाईल जॅकेट, कोट : काही वेळा हिवाळ्यातही उन्हाळ्याचा दाह जाणवतो. त्यामुळे हे कपडे सहसा कोणी घालत नाही,  हिवाळ्यात फक्त स्वेटर घालण्यापेक्षा त्यावर ब्लेझर्स, स्टाईल जॅकेट, कोट घातल्यामुळे वेगळाच लूक येईल.

क्लॉक किंवा केप स्टाईल पुलओव्हर : सध्या असे पुलओव्हर लोकर, सिल्क अशा वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये केलं जातं. विवाह समारंभातही केप स्टाईल पुलओव्हर घालण्याची फॅशन आहे.

फ्रॉक कोट : डिसेंबर महिन्यात पार्टीच्या निमित्ताने बाहेर जावे लागले तर हा फ्रॉक परिधान करू शकता. मुळात कोटप्रमाणे असलेला, पण ड्रेस स्टाईल असतो. हे शिवूनही मिळतात.

वेस्ट कोट : वेस्ट कोट ब्लेझरच्या आत घातलं जातं. हे स्लीव्हलेस असल्यामुळे शर्ट, चुडीदारवर परिधान करता येतं.

मॅच कोट किंवा ब्लँकेट रॅप स्कार्फ : हे शालीप्रमाणे असून क्रोशाच्या सुईने विणून तयार केलं जातं. हे फक्त अंगावर पांघरण्यासाठी वापरलं जातं.

जॅकेट : वेल्वेट, ब्रोकेट, सॅटिन, लोकर अशी वेगवेगळ्या प्रकारची जॅकेट्स थंडीच्या दिवसांत नेहमीच्या कपडय़ांवर वापरू शकता.

  • स्त्रियांसाठी स्वेटर्स किंवा स्वेट शर्टस्बरोबरच कार्डिगन्स ही सध्या फॅशन झालीय. ते कमी थंडीतही घालता येतात. यात पुष्कळ रंग उपलब्ध असून असंख्य डिझाइन्सही आहेत. रोज वापरायला स्वेट शर्टस्, पुलओव्हर्स व स्वेटर्सही आता अनेक प्रकारांत मिळतात. फरची टोपी असलेली किंवा नेकलाइनला फर असलेली जॅकेट्स व ओव्हरकोट्स हे कॉर्पोरेट्स वापरासाठी उत्तम पर्याय आहेत.
  • सध्या लोकरीने विणलेले किंवा बिनलोकरीचे पाँचो तरुणींना भुरळ घालत आहेत. केवळ ऊबदार कपडेच नाहीत, तर टॉप्स वा टी-शर्टस्मध्ये बंद गळय़ाचे, टर्टल नेकचे, काऊल नेकचे स्टायलिश कपडे मिळतात. ते थंडीत नक्कीच घालता येऊ शकतात. या सगळय़ासोबतच आता अनेकजण थर्मल वेअर वापरू लागले आहेत. त्यामुळे थर्मल कपडय़ांनाही सध्या बाजारात चांगली मागणी आहे.

लेखिका फॅशन डिझायनर आहेत.