
देशाचा मतदार हाच देशाचा खरा मालक आहे. परंतु भीतीपोटी तो नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय अशी सध्याची परिस्थिती आहे. ही भीती आपल्याला दूर करायची आहे. फक्त 2024मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्यात, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
पुण्यातील खडकवासला येथे आयोजित केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ते बोलत होते. गुजरात दंगलीवर आधारीत बीबीसीचा वृत्तपट दाखवणाऱयांवर केंद्राकडून कारवाई केली जात आहे. त्या वृत्तपटाच्या मुद्दय़ावरून आंबेडकर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, इतक्या मोठय़ा संख्येने आपण सभेला उपस्थित आहोत. जर याच ठिकाणी बीबीसीचा वृत्तपट आपण दाखवला असता तर सर्वांनाच पोलीस पकडू शकतील का? आणि पकडले तरी एवढय़ा लोकांना ठेवायला तुरुंगात जागा आहे का? झुकानेवाला चाहीये, सरकार झुकती है.’’ 2024मध्ये यांना झुकवा, असे आवाहनही त्यांनी केले.
मोदी कर्ज काढून देश चालवत आहेत
घर चालवायला आपल्याला हजार रुपये लागत असतील आणि आपली कमाई 800 रुपये असेल तर वरचे 200 रुपये कर्ज काढावे लागतात. त्याप्रमाणेच आज नरेंद्र मोदी कर्ज काढून देश चालवत आहेत. या कर्जासाठी कारखाने विकण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे.
नरेंद्र मोदी दारुड्यासारखे
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात देशातील सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवले होते. मी अनेक वेळा विचारलं, ते सोनं परत आणलं का? पण त्यावर कुणी उत्तर देत नाही. यावरून देशाची परिस्थिती काय आहे ते बघा. आपल्या घरातलं सोनं जेव्हा आपण गहाण ठेवतो आणि ते सोडवता येत नाही. त्यावरून आपले घर आर्थिकदृष्टय़ा दुबळे असल्याचा निष्कर्ष काढला जातो. एखादा दारुडा अशा वेळी घरातली भांडीपुंडी विकून घर चालवतो. सगळं विकून झालं की दारुडा आपलं घरही विकून टाकतो. आज नरेंद्र मोदी नेमके तेच करतायत की नाही सांगा, असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.
हिंमत असेल तर माझ्या चार प्रश्नांची उत्तरे द्या
हिंमत असेल तर माझ्या चार प्रश्नांची उत्तरे द्या, असे आव्हानही या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना दिले. मला आणि पंतप्रधान मोदींना एकाच व्यासपीठावर बसवा. मी त्यांना चार प्रश्न विचारतो, त्यांनी त्याची उत्तरे देऊन दाखवावीत किंवा मोहन भागवत यांनी तरी समोर यावे, असे ते म्हणाले.
























































