धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा न दिल्यास देशव्यापी लढ्याचा इशारा, कॉक्रोच जनता पार्टीचे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘देशातील शिक्षण व्यवस्थेचे अपयश आणि ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे तणावात गेलेल्या सहा ते सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. केवळ ‘नीट’ परीक्षाच नाही, तर ‘सीबीएससी’ व इतर स्पर्धा परीक्षांमधील काढता गोंधळ यांसारख्या प्रकारांमुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. या प्रकारांची केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्कीकारून शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे; अन्यथा आम्ही देशव्यापी आंदोलन करू,’ असा इशारा ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, ‘उद्या (दि. 11) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दुपारी चार वाजता आंदोलन करण्यात येणार असून, हे आंदोलन जंतरमंतरपेक्षाही मोठे असेल,’ असेही दीपके यांनी सांगितले.

पुण्यात होणाऱ्या आंदोलनाने या देशव्यापी आंदोलनास सुरुवात होईल. त्यानंतर लखनौ, अमृतसर, जयपूर आणि बंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही शांततेत आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करण्यात येणार आहेत. यानंतरही केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही, तर 20 जून रोजी देशभरातील तरुण दिल्लीत एकवटतील आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिकाय तिथून माघारी परतणार नाहीत,’ असा ठाम निर्धार दीपके यांनी यावेळी व्यक्त केला.

आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी होणार

पुण्यात होणाऱ्या आंदोलनात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सहभागी होणार आहेत. याबाबत अभिजित दीपके यांनी ‘एक्स’वर माहिती पोस्ट केली आहे.