
सामना प्रतिनिधी, मुंबई
कचरा कमी झाल्याचे सांगत पालिका प्रशासनाने कचरा उचलणाऱ्या तब्बल 20 टक्के गाड्या कमी केल्याने संपूर्ण मुंबईत कचराकोंडी झाली आहे. कचरा उचलायला गाड्या कमी पडत असल्याने प्रत्येक विभागात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. प्रशासनाचे नियोजन चुकल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असताना कामगार आणि ज्युनियर ऑफिसरना मात्र प्रशासनाकडून मेमो दिले जात आहेत. त्यामुळे आज संतप्त कामगारांनी माटुंगा येथील ‘एफ-उत्तर’ विभाग कार्यालयावर धडक दिली.
पालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईत दररोज जमा होणारा कचरा नऊ हजार मेट्रिक टनांवरून साडेसात हजार मेट्रिक टनांवर आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे, मात्र प्रशासनाचा हा दावा खोटा असल्याचे प्रत्यक्ष काम करणारे कामगार सांगत आहेत. कचरा उचलणाऱया तब्बल 20 टक्के गाड्या अचानक कमी केल्यामुळे ऐन दिवाळीनंतरही संपूर्ण मुंबईत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यावर स्थायी समितीत शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर आवश्यकतेनुसार गाड्या वाढवण्याचे आश्वासन उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिले, मात्र प्रत्यक्षात ‘एफ-उत्तर’ विभागात अशा गाड्या वाढवल्या नसल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे संघटक रामचंद्र लिंबारे यांनी सांगितले. संपूर्ण मुंबईत हीच स्थिती असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे चिटणीस प्रकाश वाघधरे यांनी कर्मचाऱयांना मार्गदर्शन करताना तूर्तास संयम पाळण्याचे आवाहन केले.
रहिवाशांचा रोष कामगारांवर
प्रशासनाने गाड्या कमी केल्याचे रहिवाशांना माहीत नाही, मात्र आपल्या विभागात कचरा साचल्यामुळे रहिवासी पालिकेचे कामगार दिसताच त्यांना जाब विचारत आहेत. पालिका अधिकाऱ्यांकडूनही कामगारांना दमदाटी केली जात असल्याचे रामचंद्र लिंबारे यांनी सांगितले. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर प्रशासनाने पुन्हा आवश्यकतेनुसार त्या त्या ठिकाणी गाड्या वाढवून देण्याचे आश्वासन दिल्याचे लिंबारे यांनी सांगितले.
ताबडतोब अहवाल देऊन कार्यवाही करा, स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश
पालिका प्रशासनाने कचरा उचलणाऱ्या गाड्या अचानक कमी केल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. प्रशासन जर कचरा कमी झाल्याचे सांगत असेल तर नेमका कुठल्या विभागात किती कचरा कमी झाला याचा तातडीने अहवाल सादर करावा आणि ज्या ठिकाणी कचरा उचलणाऱ्या गाड्यांची कमतरता असेल त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार गाड्या उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱयांना दिल्याचेही ते म्हणाले. प्रशासनाचे स्वतःचे नियोजन चुकले असताना जर कामगारांवर अन्याय केला जात असेल तर शिवसेना ते खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिकेच्या कामगारांमध्ये प्रचंड संताप आहे. प्रशासनाची अन्यायकारक भूमिका कायम राहिल्यास तीक्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
summary- waste issue get rise in mumbai due to bmc irresponsible work

























































